Mumbai Indians New Head Coach Announcement : आयपीएल 2027 च्या सीजनसाठी सर्व फ्रेंचायझी त्यांच्या संघांची मूठ बांधत आहेत. आगामी सीजन हे इंडियन प्रीमियर लीगचं 20 वं सीजन ठरणार आहे. तेव्हा त्या अगोदर मुंबई इंडियन्सने त्यांच्या नव्या कोचची घोषणा केली आहे. आयपीएल 2026 मध्ये महेला जयवर्धने याच्या खांद्यावर हेड कोच पदाची जबाबदारी होती, मात्र या सीजननंतर तो संघापासून वेगळा झाला. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 2027 साठी कायरन पोलार्डची नवा हेड कोच म्हणून घोषणा केली आहे. कायरन पोलार्ड हा जवळपास 16 वर्षांपासून मुंबई इंडियन्स सोबत आहे. यापूर्वी त्याने खेळाडू म्हणून मुंबई संघातून आयपीएल सामने खेळले तर मागील काही वर्षांपासून तो बॅटिंग कोच म्हणून काम पाहत होता.
खेळाडू ते हेड कोच पर्यंतचा प्रवास :
39 वर्षांचा कायरन पोलार्ड हा मूळचा वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू असून इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो 22 वर्षांचा असताना मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता. मागची 16 वर्ष तो मुंबई इंडियन्स संघाचा अविभाज्य भाग राहिला. 13 सीजन मुंबई इंडियन्स सोबत खेळल्यावर त्याने 2022 मध्ये निवृत्तीची घोषणा केली. पोलार्डने 189 सामन्यांत 3412 धावा आणि 69 विकेट घेतल्यानंतर, आयपीएलमधून खेळाडू म्हणून निवृत्तची घोषणा केली. त्यानंतर तो मुंबई इंडियन्समध्ये फलंदाजी कोच म्हणून कार्यरत होता. आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचा परफॉर्मन्स हा अगदीच खाली घसरला आणि त्यानंतर महेला जयवर्धने यांनी हेड कोचपद सोडले. त्यानंतर आगामी आयपीएल 2027 पूर्वी कायरान पोलार्डची नवीन हेड कोच म्हणून मुंबई इंडियन्सने 24 ऑक्टोबर रोजी घोषणा केली.
काय म्हणाला पोलार्ड?
मुंबई इंडियन्सच्या हेड कोचपदी नियुक्ती झाल्यावर कायरन पोलार्ड म्हणाला की, 'मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणे, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मुंबई इंडियन्स माझ्या आयुष्याचा आणि कारकिर्दीचा एक मोठा भाग राहिले आहेत. या संघाशी, खेळाडूंशी आणि 'पलटन'शी माझे जे नाते आहे, ते माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहे. खेळाडू आणि त्यानंतर प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकांतून हा प्रवास अनुभवल्यामुळे, मुंबई इंडियन्सची मूल्ये काय आहेत आणि 'ब्लू अँड गोल्ड' रंगांचे प्रतिनिधित्व करण्यासोबत कोणती जबाबदारी येते, हे मला उत्तम प्रकारे ठाऊक आहे. मी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत मिळून काम करण्यास, संघाचा वारसा पुढे नेण्यास, आपल्या प्रतिभावान खेळाडूंच्या जडणघडणीत मदत करण्यास आणि 'पलटन'ला आनंद साजरा करण्याच्या आणखी अनेक संधी मिळवून देण्यास उत्सुक आहे'.