'आम्ही टी-20 वर्ल्डकप खेळवणार, पण भारताला...', पाकिस्तानने ICC समोर ठेवली मोठी अट, 'त्यांनी चॅम्पिअन्स ट्रॉफीत...'
पाकिस्तान 2028 महिला टी-20 वर्ल्डकपमधील सर्व सामन्यांचं नियोजन करणार असून, भारताचे सामने ज्या ठिकाणी खेळवले जातील, त्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) विचार केला जात आहे.
पाकिस्तान 2028 महिला टी-20 विश्वचषकातील सर्व सामन्यांचे आयोजन करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र भारत सहभागी असलेल्या सामन्यांसाठी संयुक्त अरब अमिराती (यूएई) हे ठिकाण विचारात घेतले जात आहे. आयसीसीने शुक्रवारी जाहीर केले की, 12 संघांची ही स्पर्धा 7 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत होणार असून, पाकिस्तान मुख्य यजमान असणार आहे. मात्र, भारताच्या सामन्यांसाठी तटस्थ ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. पाकिस्तान आणि भारत एका 'हायब्रिड मॉडेल'चे पालन करेल, ज्यानुसार, जेव्हा यापैकी कोणताही देश आयसीसी किंवा आशियाई स्पर्धेचे आयोजन करतो, तेव्हा दुसरा संघ आपले सामने एका निश्चित तटस्थ ठिकाणी खेळतो.
2025 च्या चॅम्पियन ट्रॉफीपासून ही पद्धत अवलंबली जात आहे. या स्पर्धेतही पाकिस्तानच आयोजक होता. भारताने चॅम्पियन ट्रॉफीमधील आपले सर्व सामने यूएईमध्ये खेळले आणि दुबईमध्ये अंतिम सामना जिंकला. दुसरीकडे, पाकिस्तानने स्पर्धेतील 15 पैकी 10 सामन्यांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये लाहोरमध्ये झालेल्या एका उपांत्य फेरीच्या सामन्याचाही समावेश होता, ज्यात भारत सहभागी नव्हता.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील एका अधिकृत सूत्राने सांगितले की, ते महिला टी-20 वर्ल्डकप आयोजित करण्यास तयार आहेत. मात्र ते आयसीसीला (ICC) विनंती करतील की, चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान वापरलेले सूत्रच यावेळीही अवलंबले जावे. ते म्हणाले, "आम्ही दोन्ही गटांतील सामने आणि ज्या सामन्यांमध्ये भारतीय संघ सहभागी नाही, असे बाद फेरीतील (नॉकआउट) सामने आयोजित करण्यास उत्सुक आहोत."
पुढे त्यांना सांगितलं की, "संयुक्त अरब अमिरात (UAE) हे सर्वांसाठी एक योग्य तटस्थ ठिकाण ठरू शकते, कारण पाकिस्तान आणि दुबई दरम्यानचा प्रवास कमी अंतराचा आहे. ज्यामुळे व्यवस्थापकीय खर्चही कमी होतो आणि सर्व गोष्टी हाताळणे अधिक सोपे जाते."
जगातील अव्वल महिला संघांपैकी एक असलेल्या भारतीय संघ नॉकआऊटमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे. मात्र, जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नाही, तर अंतिम सामना लाहोरमध्ये आयोजित केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. आयसीसी (ICC) स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या देशांना यजमानपदाचे शुल्क मिळते, तसेच स्पर्धेशी संबंधित खर्च भागवण्यासाठी निधीही दिला जातो.
सूत्रांच्या माहितीनुसार, महिला टी-20 वर्ल्डकपमुळे पाकिस्तानातील महिला क्रिकेटला वाढ देण्यास मदत होईल. दरम्यान, टी-20 पुरुष संघांचा टी-20 वर्लडकप 12 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित केला जाणार आहे.