रोहित शर्मासाठी मुंबईच्या रस्त्यावर 100 किमी धावला जबरा फॅन, दिलेला शब्द केला पूर्ण!
रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्याच्या आनंदात निखिल धानूने 11 तास 9 मिनिटांत 100 किलोमीटर धावला. आयुष्यात एकदा तरी रोहित शर्माला भेटायचंय, अशी इच्छा तो व्यक्त करतो.
क्रिकेटपटूंबद्दल चाहत्यांचं प्रेम अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळतं. कुणी आवडत्या खेळाडूच्या नावाचा टॅटू काढतं, तर कुणी त्याच्या प्रत्येक सामन्यासाठी स्टेडियमवर हजेरी लावतं. मात्र, रोहित शर्माचा चाहता असलेल्या निखिल धनूने त्याच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी चक्क 100 किलोमीटर धावण्याचं आव्हान पूर्ण केलं आहे. रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्याच्या आनंदात निखिलने ही धाव घेतली. विशेष म्हणजे, त्याने हे अंतर 11 तास 9 मिनिटांत पूर्ण केलंय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
रोहित शर्माला मानतो 'लकी चार्म'
निखिल धनू याने रोहित शर्मासोबत धावण्याचा एक वेगळाच संबंध असल्याचं सांगितलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्मासाठी जेव्हा जेव्हा त्याने 45 किलोमीटर धावण्याचं आव्हान पूर्ण केलं, तेव्हा त्याच दिवशी रोहितने सामन्यात शतक झळकावलं. त्यामुळे रोहितसाठी धावणं ही केवळ फिटनेसची गोष्ट राहिलेली नाही, तर त्याच्याप्रती असलेलं प्रेम आणि पाठिंबा व्यक्त करण्याचा मार्ग बनला आहे. याच कारणामुळे तो रोहितला आपला 'लकी चार्म' मानतो. आयुष्यात रोहित शर्माला एकदा तरी भेटावं आणि आपलं त्याच्याप्रती असलेलं प्रेम व्यक्त कराव, अशी इच्छा निखिलने व्यक्त केली आहे.
याआधीही केलं होतं 100 किलोमीटर धावण्याचं आव्हान
2025 मध्ये टीम इंडिया वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचल्याच्या आनंदात त्याने मध्यरात्री 12.30 वाजता धावायला सुरुवात केली आणि सुमारे 11 तास 30 मिनिटांत 100 किलोमीटर पूर्ण केली. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता अंतिम सामना सुरू झाला आणि भारताने वर्ल्ड कप जिंकला, असं त्याने म्हटलं आहे.
रोहितच्या कॅप्टन्सीच्या घोषणेनंतर नवा शब्द
शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर रील पोस्ट करत निखिलने एक घोषणा केली होती. संध्याकाळी 5.45 वाजता रोहित शर्माला पुन्हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन घोषित केल्यास तो 100 किलोमीटर धावेल, असं त्याने सांगितलं होतं. मुंबई इंडियन्सने 27 नोव्हेंबर 2026 रोजी रोहितला IPL 2027 साठी पुन्हा कॅप्टन घोषित केलं. त्यानंतर निखिलने आपलं आव्हान पूर्ण केलं.
11 तास 9 मिनिटांत 100 किलोमीटर पूर्ण
निखिलच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्मासाठी त्याने 100 किलोमीटर धावण्याचं आव्हान स्वीकारलं. हे अंतर पूर्ण करण्यासाठी त्याला 11 तास 9 मिनिटे लागली. याआधी 45 किलोमीटर धावल्याचेही त्याने सांगितले.
मुंबई इंडियन्सच्या सहाव्या जेतेपदाची इच्छा
रोहित शर्मा हा केवळ क्रिकेटपटू नसून आपल्यासाठी प्रेरणास्थान असल्याचं निखिलने म्हटलं आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने IPL 2027 मध्ये सहावं जेतेपद जिंकावं, अशी त्याची मनापासून इच्छा आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने यापूर्वी पाच वेळा IPL विजेतेपद मिळवलं आहे. आता पुन्हा कर्णधारपदाची धुरा रोहितकडे आल्याने चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. निखिलनेही आपल्या धावण्याच्या माध्यमातून रोहितला पाठिंबा देत राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय.