भारतीयांनी निवृत्तीसाठी किती पैसे साठवावेत? NPS च्या नव्या सर्वेक्षणातून समोर आलं वास्तव!
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांच्या मते निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आदर्श निधी सुमारे ₹1.5 कोटी असावा. 2023 मध्ये हाच आकडा ₹1.34 कोटी होता. म्हणजे तीन वर्षांत भारतीयांच्या अपेक्षित निवृत्ती निधीत सुमारे ₹16 लाखांची वाढ झाली आहे.
नोकरी करत असताना निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहावे यासाठी मोठा निधी तयार करण्याकडे अनेकांचा कल असतो. पण ₹1.5 कोटींचा निवृत्ती निधी पुरेसा आहे का? एचडीएफसी पेन्शन फंड मॅनेजमेंटच्या एनपीएस (NPS) पसंती निर्देशांक अभ्यास 2026 मधून याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीयांना निवृत्तीसाठी सरासरी ₹1.5 कोटी पुरेसे वाटत असले, तरी उत्पन्न, खर्च आणि भविष्यातील गरजांच्या तुलनेत ही रक्कम कमी पडू शकते, असे अभ्यासातून सूचित करण्यात आले आहे.
भारतीयांना निवृत्तीसाठी ₹1.5 कोटी पुरेसे वाटतात
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांच्या मते निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आदर्श निधी सुमारे ₹1.5 कोटी असावा. 2023 मध्ये हाच आकडा ₹1.34 कोटी होता. म्हणजे तीन वर्षांत भारतीयांच्या अपेक्षित निवृत्ती निधीत सुमारे ₹16 लाखांची वाढ झाली आहे. महागाई, वाढता खर्च आणि निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजांविषयी वाढलेली जागरूकता यामागे असू शकते. मात्र, सर्वेक्षणानुसार हा अपेक्षित निधी सहभागींच्या सरासरी वार्षिक घरगुती उत्पन्न किंवा खर्चाच्या 10 पटपेक्षाही कमी आहे.
₹1.5 कोटी प्रत्येकासाठी पुरेसे असतीलच असे नाही
निवृत्तीसाठी किती निधी आवश्यक आहे, याचे एकच उत्तर सर्वांसाठी लागू होत नाही. व्यक्तीचे सध्याचे वय, निवृत्तीचे वय, मासिक खर्च, महागाई, आरोग्यावरील संभाव्य खर्च आणि निवृत्तीनंतरचे अपेक्षित आयुष्य यावर ही रक्कम अवलंबून असते. सर्वेक्षणात 47 टक्के लोकांनी वाढता वैद्यकीय खर्च, 44 टक्के लोकांनी आरोग्य आणि वाढत्या वयाशी संबंधित समस्या, तर 36 टक्के लोकांनी निवृत्तीनंतर अपुरी बचत ही चिंता असल्याचे सांगितले.
निवृत्तीनंतरही कुटुंबावर आर्थिक अवलंबित्व?
सर्वेक्षणातील आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे 69 टक्के प्रतिसादकर्त्यांना निवृत्तीनंतर कुटुंब किंवा मुलांकडून काही आर्थिक मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्याचवेळी आर्थिक उद्दिष्टांमध्ये वैद्यकीय खर्चाला 45 टक्के, आपत्कालीन तयारीला 39 टक्के, मुलांच्या शिक्षणाला 35 टक्के आणि निवृत्ती नियोजनाला 34 टक्के प्राधान्य मिळाले. त्यामुळे स्वतंत्र निवृत्ती निधी तयार करण्याची गरज अधोरेखित होते.
NPS कडे भारतीयांचा कल वाढतोय
राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अर्थात एनपीएस प्रेफरन्स इंडेक्स 2023 मधील 54 वरून 2026 मध्ये 57 झाला आहे. NPS मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार दर्शवणारा स्कोअर सहा अंकांनी वाढून 59 झाला. NPS विषयीची माहिती दर्शवणारा स्कोअर 58, तर आकर्षणाचा स्कोअर 56 नोंदवण्यात आला. सर्वेक्षणासाठी 13 शहरांतील NPSची माहिती असलेल्या 1,812 ग्राहकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. सहभागींचे वय 30 ते 55 वर्षांदरम्यान होते.
NPS निवडण्यामागे काय कारण?
NPS मधील अलीकडील बदल आणि सुविधा हे या योजनेकडे वळण्याचे सर्वात मोठे कारण ठरत असल्याचे 39 टक्के लोकांनी सांगितले. त्यानंतर करबचत हे कारण 38 टक्के आणि चांगल्या परताव्याची अपेक्षा 36 टक्के लोकांनी नमूद केली. दुसरीकडे, 26 टक्के लोकांनी लॉक-इन, तर 25 टक्के लोकांनी अनिवार्य वार्षिकी खरेदीची अट ही अडचण असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे 2023 मध्ये NPS विषयी माहितीचा अभाव मोठा अडथळा होता; आता हा मुद्दा तुलनेने मागे पडला आहे.