चेंजिंग रूमध्ये लपवलेला कॅमेरा सापडला अन् अभिनेत्रीनं त्याला बांगड्या फुटेपर्यंत मारलं! अनुभव सांगताना म्हणाली, 'माझ्या आईला...'
तिनेच एका मुलाखतीमध्ये बोलताना तिला आलेल्या कटू अनुभवांबद्दल भाष्य केलं आहे. कशाप्रकारे वरिष्ठ पदावरील व्यक्ती तिला भेटायला बोलवायच्या इथरपासून ते सेटवरील एका धक्कादायक घटनेचाही तिने उल्लेख केलाय.
मनोरंजनसृष्टीमधील कलाकारांना जितकं प्रेम मिळतं तितकेच विचित्र अनुभवही त्यांच्या वाट्याला येतात. असाच काहीसा प्रकार 'देवों के देव... महादेव' फेम अभिनेत्री सोनारिका भदौरियाबरोबर घडली. याबद्दल तिनेच एका मुलाखतीमध्ये माहिती दिली आहे. सध्या मातृत्वामध्ये रमलेल्या या अभिनेत्रीने 'हॉटफ्लाई'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. तसेच सेटवर घडलेला एक अत्यंत धक्कादायक अनुभवही तिने सांगितला आहे.
चॅनेल हेडकडून आलेला मेसेज
चॅनेल हेडने मला हॉटेल रुममध्ये भेटण्यासाठी बोलवल्याचा प्रकार एकदा नाही तर दोनदा झाल्याची माहिती सोनारिकाने दिली आहे. मला निर्माते पैसे देत नसून त्यांनी माझी आर्थिक कोंडी केली आहे. त्यामुळे तुझ्या पेमेंटसंदर्भातील चर्चेसाठी तू मला एकट्याला भेटायला हॉटेल रूमध्ये ये, असा मेसेज चॅनेल हेडकडून आल्याचा दावा, सोनारिकाने केला. "या प्रकारानंतर मी त्या चॅनेल हेडला ब्लॉक केलं होतं. मला पैसे नकोत असं मी त्यांना कळवलं होतं," असं सोनारिका म्हणाली. मला कामासाठी कुठेही तडजोड करावी लागेल अशी नक्कीच माझी आर्थिक स्थिती नसून मी चांगल्या कुटुंबातली मुलगी असल्याचं सोनारिकाने अधोरेखित केलं.
माझ्यासोबत काम करण्याची इच्छा
'देवों के देव... महादेव'मधील यशानंतर चित्रपटांमध्ये संधी मिळावी म्हणून सोनारिका प्रयत्न करत होती. अनेकदा ऑडिशन दिल्यानंतरही तिला संधी मिळाली नाही. अनेकदा मॅनेजर कास्टिंग डायरेक्टरसोबत सोनारिकाची भेट घालून द्यायचे. "एका प्रोडक्शन हाऊच्या सीईओला माझ्यासोबत काम करण्यात फार रस होता. त्याने मला भेटयला येण्यास सांगितलं. मला असे मेसेज दोन ते तीन लोकांनी केलेत. मात्र माझ्यासोबत काहीही विचित्र घडलं नाही," असं सोनारिका म्हणाली.
आई माझ्यासोबत सेटवर असायची
सोनारिकाने तिच्यासोबत घडलेली एक अन्य घटनाही सांगितली. 'देवों के देव... महादेव'च्याआधी सोनारिका एका मालिकेमध्ये काम करायची. ही मालिका कधी प्रदर्शित झाली नाही. मात्र सोनारिकाने त्यात काम केलं आहे. त्या कार्यक्रमाच्या शुटींगच्या ठिकाणी व्हॅनिटी व्हॅनला जागा नव्हती. सर्वांना वेगवेगळे छोटे रूम देण्यात आले होते. मी 24 ते 25 वर्षाची होईपर्यंत माझी आई माझ्यासोबत सेटवर शुटींगदरम्यान उपस्थित असायची असं सोनारिकाने सांगितलं.
फळीमध्ये दिसलं छोटं होल
"याच मालिकेच्या सेटवर देण्यात आलेल्या रूमध्ये मी कपडे बदल होते. तेव्हा मला कसला तरी आवाज आला आणि काहीतरी खाली पडलं. त्या रुममध्ये एका लाकडी फळीवर छोटं होल होतं. त्यात छोट्या डबीच्या आकाराचं काहीतरी ठेवल्यासारखं दिसत होतं," असं सोनारिकाने सांगितलं. "आईला तो सारा प्रकार काहीतरी गडबड असल्यासारखा वाटला. आईने तिथे सर्वांना गोळा केलं. इथे काहीतरी आहे जरा चेक करा, असं तिने सेटवरच्या लोकांना सांगितलं. कोणी पुढे येईना तेव्हा आईनेच त्या फळीवरील होलमधील ती डबी खेचून खेचून बाहेर काढली. त्यावेळी त्या डबीला एक फोन जोडलेला होता आणि त्यामध्ये रेकॉर्डींग होत असल्याचं दिसतं. ती डबी एक छोटा कॅमेरा होता," असं सोनारिकाने सांगितलं.
बांगड्या फुटेपर्यंत मारलं
तिथे असलेल्या साफसफाई कर्मचारी तेथील सर्व महिलांच्या रूमध्ये फोन ठेवून जायचा. मुली कपडे चेंज करतानाचे व्हिडीओ शूट करण्याच्या हेतूने तो हे करत होता, असं सोनारिकाने सांगितलं. हा सारा प्रकार समोर आल्यानंतर तो कॅमेरा सेट करणाऱ्या व्यक्तीला शोधून तिथे आणण्यात आलं. त्यावेळी इतर लोक काही बोलण्याआधीच मीच त्याला मारायला सुरुवात केली. मी त्याला एवढं मारली की माझ्या हातातल्या बांगड्या फुटल्या. त्यानंतरही मी त्याला मारतच होते," असं सोनारिका म्हणाली.