शाळांना हिवाळी सुट्टी कधी मिळणार?, याची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तर प्रदेश बेसिक शिक्षा परिषदेने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी जाहीर केलेल्या कॅलेंडरनुसार, राज्यातील परिषदेच्या अखत्यारितील शाळांना सलग 15 दिवसांची हिवाळी सुट्टी मिळणार आहे. 31 डिसेंबर 2026 पासून सुरू होणारी ही सुट्टी 14 जानेवारी 2027 पर्यंत असेल.
31 डिसेंबर 2026 पासून शाळांना हिवाळी सुट्टी सुरू होईल. 14 जानेवारी 2027 हा सुट्टीचा शेवटचा दिवस असेल. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सलग 15 दिवस शाळेत जाण्यापासून सुट्टी मिळणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या दिवसापासून सुरू होणारा हा ब्रेक नवीन वर्ष आणि मकर संक्रांतीच्या काळातही कायम राहणार आहे. उत्तर प्रदेश बेसिक शिक्षा परिषदेच्या शैक्षणिक कॅलेंडरमध्ये ही माहिती देण्यात आलीय.
कॅलेंडरनुसार 15 जानेवारी 2027 पासून शाळा पुन्हा सुरू होण्याचे नियोजन आहे. मात्र, या तारखेबाबत पालकांनी शाळेकडून मिळणारी सूचना तपासणे महत्त्वाचे आहे. कारण उत्तर प्रदेश सरकारच्या 2027 च्या सुट्टीच्या यादीत 15 जानेवारीला गुरु गोविंदसिंह जयंतीची सुट्टी कार्यकारी आदेशांनुसार नमूद आहे.
बेसिक शिक्षा परिषदेचे हे वेळापत्रक उत्तर प्रदेशातील सरकारी प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि संलग्न मान्यताप्राप्त बेसिक शाळांसाठी आहे. मात्र, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांना हे वेळापत्रक आपोआप लागू होत नाही. खासगी शाळाही त्यांच्या शैक्षणिक नियोजनानुसार सुट्टीच्या तारखा ठरवू शकतात. त्यामुळे पालकांनी केवळ राज्याच्या कॅलेंडरवर अवलंबून न राहता आपल्या मुलांच्या शाळेची अधिकृत सूचना तपासावी, असे आवाहन करण्यात आलंय.
उत्तर प्रदेशच्या शैक्षणिक कॅलेंडरमध्ये हिवाळ्यातील शाळांच्या वेळाही निश्चित करण्यात आल्या आहेत. 1 ऑक्टोबर ते 31 मार्च या कालावधीत शाळा सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर उन्हाळ्यात म्हणजेच 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या काळात शाळांची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 अशी असेल. थंडीच्या दिवसांत विद्यार्थ्यांना सकाळी लवकर शाळेत जावे लागू नये, यासाठी ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.
हिवाळ्यात तापमानात मोठी घट झाल्यास किंवा थंडीचा परिणाम वाढल्यास शाळांच्या वेळांमध्ये बदल होऊ शकतो. आवश्यकतेनुसार जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्रशासनाला शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत बदल करण्याचा अधिकार आहे. परिस्थिती गंभीर असल्यास अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे पालकांनी शाळेच्या नोटिससोबतच जिल्हा प्रशासनाच्या आदेशांकडेही लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.