महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अमरावतीतील नवजात बाळ विक्री प्रकरणाला आता मोठं वळण मिळालं आहे. मुख्य आरोपी असलेल्या डॉ. वैशाली भोजने आणि त्यांचे पती प्रफुल्ल भोजने यांनी चौकशीतून आणखी एक हादरणारा खुलासा केला आहे. डॉक्टर भोजने कडून मानवी तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून खोटी प्रसूती दाखवून नवजात बाळाचा जन्म दाखला तयार करुन घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेने अमरावती महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे.
डॉक्टर वैशाली भोसले यांच्यावर बाळ विक्रीचे गंभीर आरोप असताना आता त्यांच्याविषयी आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ घडवून आणली आहे. डॉ. वैशाली भोजने यांनी एका दाम्पत्याला विकलेल्या बाळाची खोटी प्रसूती दाखवून अमरावती महापालिकेतून जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणात डॉक्टरांसह काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे. 2014 मध्ये जन्मलेले हे बाळ आता 12 वर्षांचे झाले आहे. तब्बल बारा वर्षांनंतर या प्रकाराचा पर्दाफाश झाल्याने वैद्यकीय क्षेत्रासह महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणात महापालिकेतील कोणत्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, जन्म प्रमाणपत्र देताना नियमांची पायमल्ली झाली का? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
अमरावती शहरात १५ ऑक्टोबर रोजी उघडकीस आलेल्या नवजात बाळ विक्रीच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलीची प्रसूती आपल्या खासगी रुग्णालयात करून तिच्या नवजात बाळाची तब्बल 3 लाख 50 हजार रुपयांत विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप या दाम्पत्यावर आहे. या प्रकरणात यापूर्वीच चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये बाळाच्या वडिलांचाही समावेश आहे.
अमरावती महानगरपालिकेने संबंधित रुग्णालयाची तपासणी करून डॉ. भोजने दाम्पत्याच्या हॉस्पिटलला सील ठोकले. दरम्यान, डॉक्टर वैशाली भोजने यांनी बारा वर्षात सहा बाळ दुसऱ्यांच्या स्वाधीन केले असा धक्कादायक खुलासा पोलीस जबाबातून पुढे आला आहे. बाळ घेणाऱ्यांकडून पालकांना पन्नास हजार ते दीड लाखांपर्यंत रक्कम मिळाली असून अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिचे बाळ विकल्याचा गंभीर आरोप डॉक्टर वैशाली भोजने यांच्यावर आहे.
बाळ विकल्यानंतर मिळालेली रक्कम जैविक पालकांना देण्यात आली मात्र आपण रक्कम न घेतल्याचा भोजने यांचा दावा असून भोजने दाम्पत्याला 20 नोव्हेंबर पर्यंत वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे.