पुरंदर तालुक्यातील मौजे पांगारे येथे एका शिक्षिकेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. उज्वला रामदास काकडे (वय 47, रा. पांगारे) असे मृत शिक्षिकेचे नाव असून, त्या हडपसर येथील साधना विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. या घटनेमुळे संपूर्ण पुरंदर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उज्वला काकडे या नेहमीप्रमाणे नोकरीनिमित्त पांगारे येथून हडपसरकडे जात असताना न्यू इंग्लिश स्कूल पंगारेच्या पुढील 50 मीटरवर संशयित आरोपीने मालवाहू कॅरी वाहनाने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यानंतर पाइपसदृश हत्याराने त्यांच्या चेहऱ्यावर व शरीराच्या इतर भागांवर हल्ला करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता डोक्यात मोठा दगड घालून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या हत्येमागे आर्थिक देवाणघेवाण किंवा जमिनीच्या व्यवहारातून वाद असल्याची चर्चा काही ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस तपासातूनच सत्य समोर येणार आहे.
या घटनेतील सर्वाधिक हृदयद्रावक बाब म्हणजे आज मृत उज्वला काकडे यांच्या मुलीचा वाढदिवस होता. मात्र, ज्या दिवशी मुलीच्या आयुष्यात आनंदाचा क्षण असायला हवा होता, त्याच दिवशी आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उज्वला काकडे यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले असून, त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे. या घटनेने पांगारे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक स्रोतांच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच आरोपीला ताब्यात घेऊन या घटनेचा संपूर्ण उलगडा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
या अमानुष घटनेमुळे पांगारेसह संपूर्ण पुरंदर तालुक्यात संताप आणि शोककळा पसरली असून, या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.