'पाकिस्तानी कंटेंट भारतात दिसता कामा नये,' केंद्र सरकारने Netflix ला फटकारलं, फवाद खानच्या वेब सीरिजवरुन वाद
पाकिस्तानी वेब सीरिज ‘जो बचे हैं संग समेट लो’ 4 डिसेंबरला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. मात्र, भारतात या सीरिजवर बंदी घालण्यात आली आहे.
भारत सरकारने पाकिस्तानी वेब सीरिज 'जो बचे हैं संग समेट लो' (Jo Bache Hain Sang Samet Lo) वर बंदी घातली आहे. नेटफ्लिक्सची ही पहिलीच पाकिस्तानी ओरिजिनल वेब सीरिज आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला (Netflix) इशारा दिला असून, 8 मे 2025 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे (advisory) काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार, पाकिस्तानात निर्मित कोणताही चित्रपट किंवा वेब सीरिज भारतात प्रदर्शित करण्यास परवानगी नाही.
ही पाकिस्तानी सीरिज भारतात प्रदर्शित होऊ शकते, अशी माहिती अलीकडेच मंत्रालयाला मिळाली होती. त्यानंतर, सरकारने नेटफ्लिक्सला जून 2025 मध्ये दिलेल्या एका आश्वासनाची आठवण करून दिली, ज्यामध्ये त्यांनी भारतात कोणताही पाकिस्तानी कंटेंट उपलब्ध करून देणार नाही असे सांगितले होते.
ही वेब सीरिज 4 डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. ती भारतातही प्रदर्शित होऊ शकते, याबद्दल अनेक तक्रारी आणि निवेदने प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयाने हा निर्देश दिला आहे. सूत्रांनुसार, मंत्रालयाने नेटफ्लिक्सला 8 मे 2025 रोजी जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. या अॅडव्हायजरीत भारतातील सर्व ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि डिजिटल मध्यस्थांना पाकिस्तानातून येणारा कंटेट प्रसारित करण्यापासून रोखण्याचे निर्देश देण्यात आले होते.
'जो बचे हैं संग समेट लो' (Jo Bachay Hain Sang Samait Lo) ही नेटफ्लिक्सची पहिली मूळ पाकिस्तानी वेब सीरिज आहे. 4 डिसेंबरपासून ही सीरिज जगभरतील 191 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, ही सीरिज भारतात दाखवली जाणार नाही. या सीरिजवरून मोठा वाद निर्माण झाला असून, 'ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन'ने पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
ही सीरिज दोन भागांत प्रदर्शित केली जाईल. पहिल्या भागात 5 भाग आहेत आणि एकूण 13 भाग प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या सीरिजमध्ये तीन पिढ्यांच्या सहा प्रेम कथा पाहायला मिळतील. यात अहाद रझा मीर, इक्रा अझीझ, फवाद खान, माहिरा खान, हानिया आमीर, सनम सईद, हमझा अली अब्बासी, माया अली, बिलाल अश्रफ, नादिया जमील आणि समीना अहमद हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, तो भारतात पाहता येऊ शकतो. विशेष म्हणजे, या सीरिजच्या निर्मितीसाठी आठ वर्षांचा कालावधी लागला असून, याचे चित्रीकरण 200 दिवस चालले होते.