गोव्यातील मणिपाल हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागामध्ये 8 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना पहाटेच्या सुमारास आणल्यानंतर त्यांच्यावर सर्वप्रमथ उपचार करणारे डॉ. शेखर साळकर यांनी एक भावुक पोस्ट लिहिली आहे. नाना पाटेकरांचे प्राण वाचवू न शल्याबद्दल दु:ख व्यक्त करताना डॉ. साळकर यांनी नानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तातडीने वैद्यकीय मदत करण्याची क्षमता, सर्व आर्थिक बाजू भक्कम असताना आणि (नानांच्या घरापासून) अवघ्या 300 मीटर अंतरावर अत्याधुनिक हृदयविकार उपचार सुविधा उपलब्ध असूनही, नानांना वाचवणे डॉक्टरांना शक्य झाले नाही, असं म्हणत डॉ. साळकर यांनी त्या दिवशीच्या आठवणींना उजाळा देत खंत व्यक्त केली आहे.
पाच गोष्टींचा उल्लेख
डॉ. साळकर यांनी इन्स्टाग्रामवर नाना पाटेकर यांच्यासंदर्भातील आठवण सांगताना वैद्यकीय क्षेत्रातील मर्यादांवर भाष्य करत एक भावपूर्ण पोस्ट शेअर केली आहे. "जेव्हा वैद्यकीय उपचार मानवी नियंत्रणाच्या सीमांना टक्कर देतात | नानाजींना श्रद्धांजली" अशा मथळ्याखाली डॉ. साळकर यांनी ही पोस्ट लिहिली आहे. पाच अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध असूनही नानांना वाचवता आलं नाही याबद्दल वाईट वाटत असल्याचं डॉ. साळकर यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. "नाना पाटेकरांचे प्राण वाचवण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या जवळपास सर्व गोष्टी आमच्याकडे उपलब्ध होत्या. तात्काळ मदत, आर्थिक संसाधने, गाडी, अवघ्या 300 मीटर अंतरावर हृदयविकारावरील प्रगत सुविधा असलेले रुग्णालय आणि हाकेच्या अंतरावर मदतीसाठी तत्पर असलेले मित्र. तरीही, या सर्व गोष्टी हाताशी असतानाही आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही," असं डॉ. साळकर यांनी म्हटलं आहे.
परिणामाची हमी कोणतीही देऊ शकत नाही
"एक डॉक्टर म्हणून, असे क्षण आपल्याला एका गहन सत्याची जाणीव करून देतात: वैद्यकीय उपचार आशा देऊ शकतात, विज्ञान उपाय सुचवू शकते आणि वेळेवर केलेली वैद्यकीय मदत प्राण वाचवू शकते; परंतु कोणत्याही परिणामाची हमी कोणतीही व्यक्ती देऊ शकत नाही," असंही डॉ. साळकर यांनी पोस्टमध्ये आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देताना म्हटलं आहे. "वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो आणि त्वरित वैद्यकीय मदत घेतल्यास अत्यंत मोलाचा फरक पडू शकतो. असे असले तरी, सर्वोत्तम सुविधा आणि जलद प्रतिसाद असूनही, काही परिणाम आपल्या नियंत्रणाबाहेर असतात," असं नानांच्या मृत्यूचा संदर्भ देताना डॉ. साळकर म्हणालेत. "असे क्षण आपल्याला वैद्यकीय विज्ञानाच्या मर्यादांची, जीवनाच्या क्षणभंगुरतेची आणि आपल्या प्रियजनांसोबतचा प्रत्येक क्षण जपून जगण्याच्या महत्त्वाचे स्मरण करून देतात," हे सांगायला डॉ. साळकर विसरले नाहीत.
सर्वात मोठा धडा हाच आहे की...
"कदाचित यातला सर्वात मोठा धडा हाच आहे की, आपल्या आवाक्यात असलेल्या सर्व गोष्टी आपण कराव्यात आणि त्याच वेळी, आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींचा नम्रपणे स्वीकार करावा," असं पोस्टच्या शेवटी डॉ. साळकर यांनी म्हटलं आहे.
पोस्टच्या शेवटी त्यांनी,"नानांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. ओम शांती," असं म्हटलं आहे. नाना पाटेकरांचं गोव्यामध्ये 8 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे चाहत्यांबरोबरच संपूर्ण मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.