सबा खान : अभिनेता सैफ अली खान चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तीत आणि श्रीमंता वारस्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. सैल अली खान पतौडी घराण्याचा वारसदार आहे. सैफ अली खान आणि सोहा अली खान यांना चित्रपटांमध्ये पाहिले आहे. पण त्यांची बहीण, सबा अली खान, प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते. यामुळेच ती कधीच चर्चेत नसते. पण, सैफ अली खानची बहीण सबा खान नवाबांच्या 1000 कोटींच्या संपत्तीची एकटी मालकिण आहे. सबा खान 'औकाफ-ए-शाही ट्रस्ट'ची मुतवल्ली आहे.
ग्लॅमर आणि लाईमलाईट पासून दूर असलेली सबा खान 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या पतौडी घराण्याच्या वारशाची जबाबदारी सांभाळते. तिचे वडील, मन्सूर अली खान पतौडी, जे टायगर पतौडी म्हणूनही ओळखले जातात त्यांनीच ही जबाबदारी सबा खानवर सोपवली होती. सबाने एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला. ती हा वारसा कसा सांभाळते आणि भविष्यात महिलांसाठी तिला काय करायचे आहे यावर देखील तिने भाष्य केले.
शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांची कन्या सबा अली खान यांनी अलीकडेच एका मुलाखतीत आपल्या जबाबदाऱ्यांविषयी सांगितले. सबा खान भोपाळमधील 'औकाफ-ए-शाही ट्रस्ट'च्या मुतवल्ली आहेत. या ट्रस्टमध्ये त्यांच्या कुटुंबाचा वारसा जपला जातो.मुतवल्ली म्हणजे एक अशी व्यक्ती असते जी वक्फच्या देखरेख आणि व्यवस्थापनासाठी जबाबदार असते. सबाच्या बाबतीत, ही जबाबदारी भोपाळमधील ऐतिहासिक इमारती, मशिदी आणि ट्रस्टच्या मालकीच्या इतर मालमत्तांच्या देखभालीशी संबंधित आहे.
1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा वारसा सबा सांभाळत आहेत.
या मोठ्या रकमेचा अर्थ असा नाही की हा पैसा वैयक्तिक आहे किंवा भारतात तिच्या वैयक्तिक वापरासाठी येतो. ही एक धर्मादाय व्यवस्था आहे, जी सौदी अरेबियाशी संबंधित स्वतंत्र व्यक्तींद्वारे व्यवस्थापित केली जाते आणि ती एका ट्रस्टच्या जबाबदाऱ्यांनी बांधलेली आहे. यामुळे याचा एकही पैसा वापरता येत नाही असा खुलासा सबाने या मुलाखतीत केला.
टायगर पतोडी यांनी एवढी मोठी जबाबदारी का सोपवली याचा खुलासा देखील सबा यांनी केला आहे. वडिलांनी भोपाळशी संबंधित जबाबदाऱ्यांबद्दल शिकवले होते. यानंतर वडिलांनी हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती असं सबा यांनी सांगितले. सबा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कामामध्ये ट्रस्टच्या अखत्यारीतील मशिदी आणि इतर इमारतींची काळजी, देखभाल आणि आवश्यक व्यवस्था यांचा समावेश आहे. याशिवाय, पारंपरिक रिबात (धर्मादाय अतिथीगृहे) देखील या प्रणालीचा एक भाग आहेत, जी हजसाठी भोपाळहून मक्का आणि मदिना येथे प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना निवासाची सोय पुरवतात. वडिलांचा विश्वास होता की ही जबाबदारी सांभाळण्यासाठी तीच सर्वात योग्य आहे, म्हणूनच त्यांनी हा महत्त्वाचा कौटुंबिक वारसा पुढे चालवण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवला असं सबाने या मुलाखतीत सांगितले .
या मुलाखतीत सबा यांनी आणखी एक रंजक मुद्दा मांडला. मुतवल्लीची भूमिका पारंपरिकरित्या कुटुंबातील महिलाच पार पाडत आल्या आहेत. तिच्या वडिलांची भूमिका याला अपवाद होती. आता सबा ही जबाबदारी पार पाडत आहे. याचा मला अभिमान असल्याचे सबा म्हणाल्या. ट्रस्टची जबाबदारी सांभाळताना पुरुषप्रधान वातावरणात आपली भूमिका ठामपणे मांडणे थोडेसे आव्हानात्मक आहे. लोक आदर करतात. कारण त्यांना माहीत आहे की मी माझे काम गांभीर्याने करते आणि दबावाला सहज बळी पडत नाही ही जबाबदारी स्वीकारणे हा एक सबलीकरण करणारा अनुभव ठरला आहे असे सबाने सांगितले. चित्रपटांपासून दूर राहूनही, तिने कौटुंबिक वारशात स्वतःचे एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
सबाच्या महत्त्वाकांक्षा केवळ कौटुंबिक वारसा सांभाळण्यापुरत्या मर्यादित नाहीत. भोपाळमधील मालमत्तेशी संबंधित काही खटले सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत. हे खटले निकाली निघाल्यावर, तिला मुली आणि महिलांसाठी काहीतरी विशेष करायचे आहे. तरुण मुलींसाठी शाळा उघडणे, महिलांसाठी रुग्णालये बांधणे आणि ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे अशा काही योजना आहेत.
सबाच्या आयुष्यातील आव्हाने केवळ जबाबदाऱ्यांपुरती मर्यादित नाहीत. नुकतेच, तिची बहीण सोहा अली खानच्या यूट्यूब चॅनलवरील एका संभाषणादरम्यान, तिने खुलासा केला की वयाच्या 24 व्या वर्षी तिला ब्रेन ट्यूमरचे निदान झाले होते. तिने स्पष्ट केले की तो ट्यूमर सौम्य होता, म्हणजेच कर्करोग नसलेला. "एका दिवशी सगळं काही सामान्य वाटतं, आणि दुसऱ्याच दिवशी कळतं की मेंदूची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. असा अनुभव माणसाला आतून हादरवून टाकतो, पण त्याचबरोबर अडचणींना सामोरे जाण्याची शक्तीही देतो असं सबाने सांगितले.
सबाची आजी, साजिदा सुलतान, या भोपाळचे शेवटचे शासक नवाब हमीदुल्ला खान यांच्या कन्या होत्या. त्यांची मोठी बहीण, आबिदा बेगम, 1950 मध्ये पाकिस्तानात स्थलांतरित झाल्या, त्यानंतर साजिदाने घराण्याचा वारसा पुढे चालवला. साजिदा सुलतानचा विवाह पतौडीचे नवाब इफ्तिखार अली खान यांच्याशी झाला होता. त्यांचा मुलगा, मन्सूर अली खान पतौडी, एक प्रसिद्ध क्रिकेटर बनला आणि शर्मिला टागोरशी लग्न केले. यांना तीन मुले आहेत सैफ अली खान , सोहा अली खान आणि सबा अली खान.