नव्वदीत जन्मलेल्या मुलांसाठी जोश सिनेमा आवडीच्या सिनेमांपैकी एक असेल. त्यात अभिनेता शरद कपूरने साऱ्यांचे लक्ष वेधले. पण तुम्ही आता या अभिनेत्याला पाहिलात तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून शरद कपूर चाहत्यांसमोर आलाय. ज्यातून त्याची आर्थिक, शारीरिक स्थितीही दिसतेय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
बॉलिवूड अभिनेता शरद कपूर यांचा एक भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने आपल्या चार पाळीव कुत्र्यांना घरातून प्राणी कल्याण केंद्रात हलवले. हे घडत असताना अभिनेता शरद कपूर भावुक झाल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते. या कुत्र्यांशी त्यांचे घट्ट भावनिक नाते आहे. त्यामुळे त्यांच्यापासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय शरद यांच्यासाठी सोपा नव्हता. ‘मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही,’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
शरद कपूरची मैत्रीण आणि मुंबईतील पब्लिक वेल्फेअर ट्रस्टच्या संस्थापक हेमा चौधरी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. शरद सध्या काही शारीरिक अडचणींचा सामना करत असून त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे आणि देखभालीकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्या घरी पत्नी आणि नुकतेच जन्मलेले बाळही आहे. अशा परिस्थितीत चार कुत्र्यांची योग्य काळजी घेणे कठीण होत असल्याचे त्याने सांगितले. घरात कुत्र्यांची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती उपलब्ध नसल्याने हा निर्णय घ्यावा लागलाय.
या चारही कुत्र्यांना तात्पुरत्या प्राणी कल्याण केंद्रात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. योदा मुंबई ही संस्था त्यांच्या देखभालीसाठी पुढे आली. कुत्र्यांना सुरक्षित वातावरण, आवश्यक काळजी आणि लक्ष मिळावे, हा या व्यवस्थेमागचा उद्देश आहे, असे हेमा चौधरी यांनी सांगितले. शरदच्या कुटुंबावर सध्या कठीण परिस्थिती असल्याने कुत्र्यांची जबाबदारी काही काळ संस्थेकडे देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
व्हिडीओमध्ये शरद कपूर आपल्या कुत्र्यांविषयी बोलताना भावुक झालेला दिसतोय. सध्याची घरातील परिस्थिती सुधारल्यानंतर आणि नव्या बंगल्यात राहायला गेल्यानंतर योदा संस्थेकडून आपल्या कुत्र्यांना पुन्हा घरी आणण्याची विनंती करणार असल्याचे त्याने सांगितले. आपल्या पाळीव प्राण्यांनाही आपल्यापासून दूर राहिल्याने त्रास होईल, अशी भावनाही त्याने व्यक्त केली. प्राण्यांवर प्रेम करणे आणि त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे तो यावेळी म्हणाले.
शरद कपूरच्या परिस्थितीवरून सोशल मीडियावर टीका किंवा ट्रोलिंग करू नये, असे आवाहन हेमा चौधरी यांनी केले आहे. त्या गेल्या सुमारे 30 वर्षांपासून शरदला ओळखत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या अडचणी समजल्यानंतर आपण त्याला भेटण्यासाठी गेल्याचे त्या म्हणाली. शरद कपूरने ‘दस्तक’, ‘जोश’, ‘लक्ष्य’ आणि ‘जय हो’ यांसारख्या चित्रपटांत काम केलंय. विशेषतः ‘जोश’मधील भूमिकेमुळे त्याला ओळख मिळाली. लवकरच शरद कपूरची परिस्थिती सुधारावी आणि तो आपल्या पाळीव कुत्र्यासोबत पुन्हा राहावा, अशी प्रार्थना त्याचे चाहते करत आहेत.