2000 च्या दशकाच्या सुरुवातीला रणवीर शौरी आणि पूजा भट्ट एकमेकांना डेट करत होते आणि एकत्र राहत होते. मात्र 2002 च्या सुमारास त्यांचा ब्रेकअप झाला. रणवीरने तिच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवल्याचा आरोप यापूर्वी केला होता. दरम्ान पूजा भट्टचा धाकटा भाऊ राहुल भट्ट याने अलीकडेच दोन दशकांपूर्वी घडलेल्या रणवीर शौरीशी संबंधित एका घटनेबद्दल भाष्य केले आहे. आपल्या बहिणीच्या संरक्षणासाठी आपण रणवीरला मारहाण केली होती, असा दावा त्याने केला. तसेच, कायदा हातात घेतल्याबद्दल आपल्याला पश्चात्ताप होत असल्याचेही राहुल भट्टने सांगितले.
सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टवरील संभाषणात राहुल भट्टने सांगितले की, "रणवीर शौरी आणि पूजा भट्ट यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर रणवीरने तिला मारले किंवा तसे काहीतरी केले. मला त्यात हस्तक्षेप करावा लागला आणि मी जेव्हा हस्तक्षेप केला, तेव्हा माझी प्रतिक्रिया काहीशी हिंसात्मक होती. मी त्याच्या गाडीची काच फोडली. मी त्याची एक बरगडी मोडली. कायदा हातात घेऊन मी चुकीचे काम केले होते. त्यानंतर, मला त्याची किंमत मोजावी लागली. मला अटक झाली आणि माझ्यावर आरोपही ठेवण्यात आले."
तो पुढे म्हणाला, "मला त्याबद्दल पश्चात्ताप आहे. मी त्या प्रकारे व्यक्त व्हायला नको होते. त्यावेळी मी म्हणालो होतो की मी पुन्हा तसे करेन; पण रणवीर शौरीच्या बाबतीत मी तसे करायला नको होते. तो खूप समंजसपणे वागला. प्रकरण मिटवण्याच्या वेळी तो स्वतःहून पुढे आला आणि म्हणाला, 'जे झाले ते विसरून जाऊया.'"
"सहसा कोणीही असे करत नाही. लोक अशा परिस्थितीचा वापर करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात, पण त्याने तसे केले नाही. त्याने येऊन तडजोड केली आणि एफआयआर (FIR) रद्द करण्यात आला. तोपर्यंत माझ्यावर फौजदारी खटला प्रलंबित होता. या बाबतीत त्याचे वागणे अतिशय सभ्य होते. त्याबद्दल मी त्याचा आदर करतो. मनात कोणताही राग न ठेवता दुसरे कोणीही असे केले नसते," असे राहुल भट्टने सांगितले.
या वादाबद्दल रणवीर शौरी काय म्हणाला होता?
रणवीर शौरी हा 'बिग बॉस ओटीटी 3' (Bigg Boss OTT 3) मधील 'सेकंड रनर-अप' होता. त्यावेळी, त्याने आपल्याया देण्यात आलेली अपमानास्पद वागणूक याबद्दल सांगताना महेश भट्ट यांनी खोटे आरोप केल्याचा दावा केला होता.
रणवीर शौरी म्हणाला होता, "त्याच काळात, एका दुसऱ्या अभिनेत्रीमुळे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वादाचा मला सामना करावा लागला. त्या परिस्थितीचा सामना करणे मला कठीण जात होते, तेव्हा माझ्या भावाने मला काही काळासाठी त्याच्यासोबत अमेरिकेला येण्याचा सल्ला दिला. मी अमेरिकेत सहा महिन्यांचा अभिनयाचा कोर्स केला आणि त्यासाठी माझ्या भावाकडून पैसे उसने घेतले. अमेरिकेतून परत आल्यावर, 2005 मध्ये मी 'द ग्रेट इंडियन कॉमेडी शो'च्या (The Great Indian Comedy Show) चित्रीकरणाला सुरुवात केली. त्याच वेळी, बऱ्याच काळापासून रखडलेल्या माझ्या दोन चित्रपटांना प्रदर्शनासाठी हिरवा कंदील मिळाला आणि ते एका आठवड्याच्या अंतराने लागोपाठ प्रदर्शित झाले; प्रेक्षकांनी माझ्या कामाला खूप पसंती दिली. त्या चित्रपटांनंतर, एक अभिनेता म्हणून माझे आयुष्य स्थिरावले आहे आणि मला अखेर यश मिळाले आहे, अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली."
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत रणवीर शौरीने भट्ट कुटुंबासोबतच्या आपल्या दुराव्यावर भाष्य केले होते. प्रेमात पडण्यापूर्वी रणवीर आणि पूजा जवळचे मित्र होते, परंतु त्यांचे नाते अत्यंत नाट्यमयरीत्या संपुष्टात आले. पूजाने रणवीरवर शारीरिक आणि शाब्दिक छळाचे आरोप केले होते, जे त्याने ठामपणे फेटाळून लावले आहेत.
रणवीरने स्पष्ट केले, "आमच्यात जेव्हा वाद झाला, तेव्हा मला असे वाटले की माझ्या मनात त्यांच्याबद्दल (महेश भट) जो आदर होता, त्याचा त्यांनी कपटीपणाने गैरफायदा घेतला. वाद झाल्यानंतर त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की, 'ठीक आहे, मुलांमध्ये जे काही भांडण झाले आहे ते आपण इथेच संपवूया.' पण दुसऱ्याच दिवशी, त्यांनी माझ्याबद्दल पूर्णपणे खोट्या गोष्टी छापल्या आणि माध्यमांमध्ये माझ्याविरुद्ध चुकीच्या बातम्या पसरवल्या; मला मद्यपी आणि हिंसक व्यक्ती म्हणून रंगवले. त्या सर्व गोष्टी खोट्या होत्या."
जेव्हा त्याला विचारण्यात आले की हा वाद केवळ त्याच्या आणि पूजाच्या दरम्यान होता का, तेव्हा रणवीर म्हणाला, "तिच्या भावानेच माझ्यावर हात उचलला होता. त्यांनी (महेश भट) त्या लोकांना तसे न बोलण्यास सांगितले असते तर बरे झाले असते. त्या अर्थाने, मला वाटले की त्यांनी माझ्याशी कपटीपणाने वागले. या सर्व २५ वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत. मला आता त्याबद्दल अधिक बोलायचे नाही."
पूजा भटने यापूर्वी असा दावा केला होता की, मद्यपान केल्यानंतर रणवीर हिंसक व्हायचा आणि शारीरिक छळ करायचा. 'बिग बॉस'मध्ये रणवीरने पूजा भटसोबतच्या आपल्या नात्याचा उल्लेख त्याच्या आयुष्यातील "सर्वात मोठ्या वादांपैकी एक" असा केला होता.