अभिनेता रणबीर कपूर, दाक्षिणात्य अभिनेता यश आणि अभिनेत्री साई पल्लवीची प्रमुख भूमिका असलेल्या रामायण या महाकाव्यावरील दोन चित्रपटांच्या भागांपैकी पहिला भाग लवकरच प्रदर्शित होत आहे. 'रामायण: भाग 1' हा चित्रपट दिवाळीच्या आधीच म्हणजे 5 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरपासून ते चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या लूक्सपर्यंत अनेक गोष्टी चर्चेत असतानाच या चित्रपटाच्या तिकिटांचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. खरं तर कोणत्याही चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग रिलीज डेटच्या काही दिवस आधी सुरू होते, परंतु 'रामायण' चित्रपटासाठी वेगळ्या पद्धतीने नियोजन करण्यात आलं असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 16 दिवस आधीपासूनच ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चित्रपटाची मुंबईतील तिकीटांचे दर पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे.
कितीला आहे तिकीट?
'रामायण: भाग 1' या चित्रपटाचे शो सकाळी सहा वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत असणार आहेत. ॲडव्हान्स बुकिंग सुरू असल्यामुळे तिकिटांचे दरही समोर आले असून अनेक ऑनलाइन तिकीट बुकिंग वेबसाईटवरुन यासाठी बुकिंग सुरु झालं आहे. सर्वात लोकप्रिय तिकीट बुकिंग साईट्सपैकी एक असलेल्या 'बुकमायशो'च्या प्लॅटफॉर्मवरही ही सोय उपलब्ध असून येथे दिसणारे दर पाहून थक्क व्हायला होईल. आता उदाहरण घ्यायचं झालं तर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसीमधील मेसन आयनॉक्स जिओ वर्ल्ड प्लाझा येथील तिकीट पाहिलं तर ते मुंबईमधील 'रामायण: भाग 1' या चित्रपटाचे सर्वात महाग तिकीट ठरेल.
बीकेसीतल्या या थेअटरमधील 'रामायण: भाग 1' या चित्रपटाचे थ्रीडी-इन्सिग्नियाचं संध्याकाळी 7.10 च्या शोचं एक तिरीट तब्बल 26200 रुपयांना आहे. कनव्हिनिअन्स फीसहीत हे तिकीट 2690 रुपयांना आहे. म्हणजेच 150 ते 200 रुपयाचं एक तिकीट असा विचार केला तर 'रामायण: भाग 1' या चित्रपटाच्या एका तिकीटाच्या दरात 15 चित्रपट पाहून होतील.

'रामायण' यशस्वी होणार अशी थिएटर मालकांना खात्री म्हणूनच...
'रामायण: भाग १' चे शो सकाळी ६ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत असणार आहेत. 'रामायण: भाग 1' या चित्रपटा मुंबईतील सर्वात पहिला शो सकाळी सहा वाजता गोरेगावमधील 'मिराज सिनेमॅक्स' येथे सुरु होईल. याव्यतिरिक्त, 'बुकमायशो'वरील माहितीनुसार, अनेक चित्रपटगृहांनी मध्यरात्रीचे शो देखील लिस्ट केल्याचं दिसत आहे. खरं तर एखाद्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर त्याचे मध्यरात्रीचे शो सुरु केले जातात. मात्र दिवाळीच्या तोंडावर प्रदर्शित होणाऱ्या 'रामायण' चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळेल असा विश्वास अनेक थिएटर मालकांना असल्याने त्यांनी आधीच मध्यरात्रीचे शो लावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 'रामायण' चित्रपटाचे 'पेड प्रिव्ह्यूज' 4 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहेत. मात्र, ॲडव्हान्स बुकिंग 5 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.
'रामायण'मध्ये कोणकोणते कलाकार?
रणबीर कपूरने 'रामायण: भाग 1' या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली असून सईने सिता मातेची भूमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'रामायण'मध्ये रवी दुबे, सनी देओल, अरुण गोविल, लारा दत्ता, इंदिरा कृष्णन, सोनल झा, रकुल प्रीत सिंग, काजल अग्रवाल, कुणाल कपूर, आदिनाथ एम. कोठारे आणि इतर कलाकारही दिसणार आहेत.