Let's Solve This S**t, Bro! सलमान खानच्या 'मातृभूमी' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर अखेर रिलीज!
सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'मातृभूमी' चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान पहिल्यांदाच लष्कर जवानाच्या भूमिकेत दिसणार आहे.
बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या आगामी 'मातृभूमी' (Matrubhumi) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच अखेर ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलरला नुकतीच मंजुरी मिळाली. यानंतर 10 नोव्हेंबरला तो अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात आला आहे. युद्धावर आधारित या चित्रपटाची पहिली झलक अत्यंत प्रभावी आहे. 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' (Matrubhumi: May War Rest in Peace) हा चित्रपट देशभक्ती, त्याग आणि युद्धामुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम यावर भाष्य करतो.
'मातृभूमी'चा ट्रेलर प्रदर्शित
'मातृभूमी'च्या निर्मात्यांनी अखेर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. यात लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत सलमान खान प्रभावी दिसत आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये देशभक्तीची भावना दिसून येते. ट्रेलरमध्ये ॲक्शन सीक्वेन्स, अंगावर शहारे आणणारी लढाई आणि काही जबरदस्त सीन्सचा समावेश आहे. चित्रपटाच्या माध्यमातून युद्धामुळे कोणाचेही भले होत नाही असा संदेश दिला जात असल्याचंही दिसत आहे. धाडस फक्त युद्ध करण्यात नाही तर ते रोखण्यातही आहे असं यात सलमान सांगताना दिसत आहे.
ट्रेलर पाहिल्यानंतर, चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सलमान खानला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 'मातृभूमी' 4 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'मातृभूमी'ला कोणते प्रमाणपत्र मिळाले आहे?
'व्हरायटी इंडिया' (Variety India) नुसार, 'मातृभूमी'च्या ट्रेलरला 'यू/ए' (U/A) प्रमाणपत्र मिळाले आहे.
'मातृभूमी'समोर अडचणी
अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटाचे सुरुवातीचे शीर्षक 'बॅटल ऑफ गलवान' (Battle of Galwan) असे होते. हा चित्रपट गलवान खोऱ्यात 2020 मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. चित्रपटाचा विषय आणि चीनच्या उल्लेखांमुळे त्यांना विविध अडथळ्यांचा सामना करावा लागला. विशेषतः, दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांत होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर या अडचणी निर्माण झाल्या होत्या.
सलमान खानच्या 'मातृभूमी' (Matrubhumi) चित्रपटाबद्दल
चित्रपटात सलमान खान कर्नल बिक्कुमाला संतोष बाबू यांची भूमिका साकारत आहेत. '16 बिहार रेजिमेंट'चे कमांडिंग ऑफिसर म्हणून, त्यांनी 2020 मधील गलवान खोऱ्यातील संघर्षादरम्यान भारतीय सैनिकांचे नेतृत्व केले होते. त्यांना मरणोत्तर 'महावीर चक्र' देऊन सन्मानित करण्यात आले होते. चित्रपटाची संपूर्ण कथा त्यांच्या पात्राभोवती फिरते.
या चित्रपटात मुकेश ऋषी, अंकुर भाटिया, जेन शॉ आणि अभिलाष चौधरी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत असून, त्यांनी सीमेवरील मोहिमांमध्ये सहभागी असलेले लष्करी अधिकारी आणि इतर प्रमुख व्यक्तींच्या भूमिका साकारल्या आहेत.