मोटिव्हेशनल स्पीकर आणि उद्योजक संदीप महेश्वरी गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियापासून दूर आहेत. त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर नवे व्हिडीओ न दिसल्याने चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले. एआयमुळे इमेज बाजार हा व्यवसाय अडचणीत आल्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाली. या चर्चांवर आता संदीप महेश्वरी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काय म्हणाले संदीप माहेश्वरी? सविस्तर जाणून घेऊया.
संदीप महेश्वरी यांनी पोस्टमध्ये सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी एकही व्हिडीओ अपलोड केलेला नाही. त्यामुळे अनेक चाहत्यांनी त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांच्या अनुपस्थितीबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज बांधले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. काही अंदाज तर आपल्या व्हिडीओंच्या कल्पनांपेक्षाही अधिक कल्पक असल्याची मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. चाहत्यांनी दाखवलेल्या काळजीबद्दल त्यांनी आभार मानले.
आपण पूर्णपणे ठीक असून प्रकृती उत्तम असल्याचे संदीप महेश्वरी यांनी स्पष्ट केले. स्वतःच्या फिटनेसबाबतही त्यांनी चाहत्यांना आश्वस्त केले. पत्नी, दोन मुले आणि मिनी-मिकी या दोन मांजरांसह कुटुंबात सर्व काही व्यवस्थित असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये सांगितले. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडियावरील शांततेमागे आरोग्याची समस्या असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय.
सर्वाधिक चर्चा एआयमुळे इमेज बाझार व्यवसाय बंद पडल्याची असल्याचे त्यांनी सांगितले. या तंत्रज्ञानाचा व्यवसायावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, स्वतःच्या टीमसोबत व्यवसायाची दिशा बदलून या परिस्थितीचा सामना केल्याचा दावा त्यांनी केला. त्यांचे इतरही व्यवसाय आणि उत्पन्नाचे विविध स्रोत असल्याने आर्थिक अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यूट्यूबवर जाहिराती सुरू केल्या तरी उत्पन्न मिळू शकते, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
व्हिडीओ बनवणे थांबवण्यामागे आर्थिक कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चॅनेल सुरू करण्यामागचा उद्देश स्वतःचे ज्ञान, विचार आणि अनुभव लोकांपर्यंत पोहोचवणे हा होता. गेल्या 14 वर्षांत आपल्याला जे काही शिकता आले, ते सर्व प्रेक्षकांसोबत शेअर केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता केवळ व्हिडीओ अपलोड करण्यासाठी व्हिडीओ बनवण्यात त्यांना रस नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या आपण छोटासा ब्रेक घेतला असून त्याचा आनंद घेत असल्याचे संदीप महेश्वरी यांनी सांगितले. हा फक्त एक छोटासा ब्रेक आहे—आणि मी याचा पूर्ण आनंद घेत आहे. भविष्यात जेव्हा कधी माझ्याकडे शेअर करण्यासारखी नवीन गोष्ट असेल, तेव्हा मी नक्कीच पुन्हा व्हिडिओ घेऊन येईन, असे ते म्हणाले.