ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या निधनानंतर त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. नानांना कृतिशील श्रद्धांजली वाहण्यासाठी सरहद संस्थेतर्फे काश्मीरमध्ये नानांच्या नावाने शाळा सुरू करण्याचा संकल्प केला आहे. सरहदचे समन्वयक जाहीद भट व सलीम रैना यांनी काश्मीरमध्ये नाना पाटेकर यांच्या नावाने शाळा सुरू करण्यासाठी स्वमालकीची जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे 'नाम फाऊंडेशन'चं काश्मीरमध्ये बरंच काम आहे. नानांची एक इच्छा अपूर्ण राहिल्याने अनोख्या पद्धतीने त्यांच्या नावे शाळा सुरू त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
नानांची कोणती इच्छा अपूर्ण राहिली
सरहद संस्था अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये काम करीत आहे. संस्थेतर्फे कुपवाडा जिल्ह्यातील दर्दपोरा आणि बांदिपोरा जिल्ह्यातील आरागाम येथे शाळा चालवली जाते. नाना पाटेकर यांचे काश्मीरवर विशेष प्रेम होते. काश्मीरमधील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काम करण्याचा मानस व्यक्त केला होता. नाना आणि त्यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी 'सरहद'चे मयूर मसूरकर आणि राजू फरांदे यांची चर्चाही झाली होती. मात्र, नानांच्या अकाली निधनानंतर आता त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले जाणार आहे. 'मल्हार पाटेकर आणि कुटुंबीयांनी मान्यता दिल्यास नाना पाटेकर यांच्या नावाने काश्मीरमध्ये शाळा सुरू करण्यात येईल,' असे मसूरकर आणि फरांदे यांनी सांगितले.
'नाम'चं जम्मू-काश्मीरमधील काम
'नाम फाउंडेशन'चे काश्मीरमधील काम मुख्यत शिक्षण, शाळांच्या सुधारणा आणि कौशल्य विकासावर केंद्रित आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी 2015 मध्ये स्थापन केलेल्या 'नाम' प्रामुख्याने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करते, पण जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सेनेसोबत काही विशिष्ट उपक्रम 'नाम'च्या माध्यमातून राबवले जातात.
नियंत्रण रेषेजवळ (एलओसी), उत्तर काश्मीरच्या बोनियार/उरी भागातील गग्गर हिल प्राइमरी स्कूलचे नूतनीकरण 'नाम फाउंडेशन'ने भारतीय सेनेच्या सहकार्याने केले. भारतीय लष्करामधील चिनार कॉर्प्स, डॅगर डिव्हिजन, पीर पंजाल ब्रिगेडच्या तुकडीने यासाठी मदत केली. शाळेच्या भिंती रंगवण्यात आल्या असून पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेच्या बॅग, शूज, उबदार मोजे, वर्दी आणि स्टेशनरी वितरित करण्यात आलेलं. चोटाली आणि कुराली या जवळच्या शाळांच्या विद्यार्थ्यांनाही साहित्य दिले गेले. बोनियारमधील चिनार नौजवान क्लब / जवान क्लबला हॉस्पिटॅलिटी, बेकरी, आयटी आणि टेलरिंग कोर्सेससाठी साहित्य 'नाम'च्या माध्यमातून देण्यात आले. स्थानिक युवकांना आणि महिलांना शिवण मशीन, एम्ब्रॉयडरी साहित्य इत्यादी देऊन स्वयंरोजगाराला प्रोत्साहन दिले. रिमोट आणि एलओसीजवळच्या गावांतील विद्यार्थी व कुटुंबांना स्वावलंबी करण्यावर भर देण्यात आला.