ठाण्यामधील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामध्ये न्यायाची मागणी करणाऱ्या पूर्णेकर कुटुंबाच्या समर्थनार्थ त्यांचे समर्थक घोडबंदर रोडवर मोठ्या संख्येनं जमले. मानपाडा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पूर्णेकरांचे समर्थक रस्त्यावर उतरले. जागोजागी टायर जाळण्यात आले. त्यामुळे पहाटेपर्यंत या मार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. माजी महापौर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करावी, अशी मागणी पूर्णेकर कुटुंब आणि त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे. याच मागणीसाठी प्रदीप पूर्णेकरांचे पुत्र राम पूर्णेकर हे आपल्या कुटुंबियासहीत आधी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या काजुवाडी येथील घराजवळ आणि नंतर नौपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलनासाठी बसले.
पोलीस स्टेशनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची गर्दी
पूर्णेकर कुटुंबीय आणि समर्थकांचं हे आंदोलन रात्रभर सुरु होतं. या प्रकरणात आता शिंदेंच्या शिवसेनेनंही आक्रमक भूमिका घेतली आहे. नौपाडा पोलीस स्थानकामध्ये आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेही पोहोचले आहेत. काल या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारेही उपस्थित होते. राम पूर्णेकरांंना नौपाडा पोलिसांनी का ताब्यात घेतलं? असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पोलिसांना विचारत होते.
'आनंद आश्रमला जमा'
शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्ते जमा असं सांगितलं. "शिवसैनिकांनो, आनंद आश्रम येथे जमा", असं म्हस्केंनी म्हटलं आहे. या आवाहनानंतर आनंद आश्रम येथे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे. खासदार नरेश म्हस्के हे आनंद आश्रम येथे आहेत. या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक, विभाग प्रमुख शाखा प्रमुख जमायला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात खासदार नरेश म्हस्के आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक साधणार माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
रात्रभर गोंधळ
मंगळवारी रात्री संतप्त पूर्णेकर समर्थकांनी घोडबंदर रोडवरील मानपाडा परिसरात तीव्र रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे घोडबंदर रोडवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं दिसून आलं. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करत राजेंद्र शिंदे व माजी नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांच्या तात्काळ अटकेची मागणी पूर्णेकर समर्थकांकडून केली जात आहे. पहाटे अडीच ते तीननंतरही अनेक ठिकाणी या आंदोलनामुळे वाहनं अडकून असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखून धरण्यात आली. पूर्णेकरांना न्याय देण्याची मागणी करत समर्थक घोषणाबाजी करत होते.