गायिका शिल्पा रावला मुंबईतील आयोजित कार्यक्रमात मध्यातच आपला परफॉर्मन्स थांबवावा लागला. याचं कारण आयोजकांनी गाणं गात असतानाच तिचा माईक बंद करुन टाकला. मुंबईत आयोजित 'बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट'च्या 10 व्या वर्धापन दिन सोहळ्यात हा प्रकार घडला. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेत विलंब झाल्यामुळे तो अचानक थांबवण्यात आला. या प्रकारामुळे शिल्पा राव नाराज झाली असून, तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहते. आज माझ्या मनाचा एक भाग दुखावला असल्याचं तिने म्हटलं आहे.
झालं असं की, कार्यक्रमाची वेळ संपल्याने सुरू असतानाच शिल्पा रावचा मायक्रोफोन आणि इलेक्ट्रॉनिक ऑडिओ डिव्हाइस बंद करण्यात आली. दरम्यान शिल्पा राव प्रेक्षकांचे आभार मानून निरोप घेण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्याच कार्यक्रमातील दुसरे कलाकार कुटले खान यांनी आपला परफॉर्मन्स सुरु केला. ज्यामुळे शिल्पा रावचे समारोपाचे बोलही पूर्ण होऊ शकले नाहीत.
या प्रकारानंतर, शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टेटमेंट शेअर केले आहे. यामध्ये तिने आपली निराशा व्यक्त केली आणि त्याच वेळी मुंबईतील प्रेक्षकांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. तिने लिहिले, "मुंबई, आज रात्री माझ्या मनाचा एक छोटासा भाग दुखावला गेला आहे. इतकी सुंदर गोष्ट अशा प्रकारे हिरावून घेतली जाणे, हे मनाला खूप वेदना देणारे आहे." ती पुढे म्हणाली, "पण संगीत थांबले तरी, तुम्ही थांबला नाहीत. ज्या पद्धतीने तुम्ही माझे नाव पुकारत होतात, तुमच्या आवाजातील तो प्रेमळ भाव... आज रात्रीची आपली गोष्ट अपूर्ण राहिली. मी वचन देते, मी नक्की परत येईन."

यानंतर सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त होत आहेत. कार्यक्रमात उपस्थित असलेले लोक आणि चाहत्यांनी गैरव्यवस्थापनाबद्दल तसेच एका ज्येष्ठ कलाकाराचा अनादर केल्याबद्दल आयोजकांवर जोरदार टीका केली. कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यांनी कार्यक्रम जवळपास 45 मिनिटे उशिरा सुरू झाला होता, ज्यामुळे कलाकारांच्या सादरीकरणाचा वेळ कमी झाला असे निदर्शनास आणून दिले. "#JusticeForShilpaRao" सारखे हॅशटॅग विविध प्लॅटफॉर्मवर वेगाने ट्रेंड होऊ लागले.
एका युजरने एक्सवर पोस्ट केली की, "#BollywoodMusicProject मध्ये शिल्पा रावसोबत जे घडले, ते अत्यंत धक्कादायक आहे. तिला 'धन्यवाद' म्हणण्यासाठीही वेळ दिला गेला नाही. तिचे सादरीकरण मध्येच थांबवण्यात आले आणि सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करण्यात आली."
दुसऱ्या एका य़ुजरने सर्वात वाईट व्यवस्थापन असल्याची टीका करताना म्हटलं, "कुटले खान यांच्या सादरीकरणादरम्यान शिल्पाच्या सादरीकरणात अचानक व्यत्यय आणला गेला आणि आयोजकांनी तिचे माईक बंद केले. अत्यंत निकृष्ट दर्जाचे नियोजन! अशी गोष्ट कोणत्याही कलाकारासोबत घडू नये." इन्स्टाग्रामवरही अनेकांनी अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या;