कारवर गोळ्या झाडून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर अभिनेता टायगर श्रॉफला मोठा धक्का बसला आहे. "माझं कोणाशीही शत्रुत्व नाही," असं सांगत त्याने आपल्यावरील हल्ल्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. या हल्ल्यातून सुदैवाने टायगर श्रॉफ बचावला, मात्र त्याचा चालक आणि एक व्लॉगर जखमी झाले आहेत. 18 ऑक्टोबरच्या संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात दोन व्यक्तींनी त्याच्या बीएमडब्ल्यू (BMW) कारवर पाच ते सहा गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर ते दुचाकीवरून पसार झाले.
या हल्ल्यातून टायगर श्रॉफ अजूनही सावरलेला नाही आणि त्याने आतापर्यंत पोलिसांकडे आपला जबाब नोंदवलेला नाही. त्याच्या घरी जबाब नोंदवण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला त्याने सांगितले, "मी खूप धक्क्यात आहे. मला सध्या काहीही बोलायचे नाही. माझ्यावर जीवघेणा हल्ला कोणी आणि का केला असेल?", असं त्याने विचारलं. "माझं कोणाशीही शत्रुत्व नाही... मग माझ्यावर हल्ला का झाला,?" असा प्रश्न त्याने विचारला. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी टायगर श्रॉफचा चालक फिरदोस बलोच आणि व्लॉगर उमेद चौहान यांचे जबाब नोंदवले आहेत.
टायगर श्रॉफवर रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास, फुटबॉल खेळून परतत असताना त्याच्यावर हल्ला झाला. अभिनेता त्याच्या बीएमडब्ल्यू (BMW) कारमध्ये पुढच्या सीटवर बसला होता. सुदैवाने या हल्ल्यातून तो वाचला आहे. हल्ल्यानंतर समोर आलेल्या अनेक व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती कारवर गोळीबार करताना दिसत आहेत. गोळीबारानंतर, टायगर श्रॉफ गाडीतून बाहेर पडून स्वतः गाडी चालवत आपल्या जखमी चालकाला रुग्णालयात घेऊन जाताना दिसला.
हे दोन हल्लेखोर ज्यांची ओळख नंतर हरियाणातील फूल सिंग (18) आणि रेहान रहीसुद्दीन अन्सारी (18) अशी पटली. दोघेही तिसरा आरोपी बिहारमधील हृतिक कुमार ऊर्फ रोशन (२२) याच्यासह दुचाकीवरुन तिथून पसार झाले. हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी अंधेरी भागात बेवारस अवस्थेत सापडली आहे.
त्यानंतर आरोपी सुरतला पळून गेले आणि जयपूरला जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये बसले. दुसऱ्या दिवशी त्यांना राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली. हे तिघे बसने दिल्लीला जाणार होते आणि तिथून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यादरम्यान आरोपींपैकी एकाने वापरलेली तुर्की बनावटीची पिस्तूल जॅम झाली होती. रेहानने वापरलेली 'झिगाना' (Zigana) पिस्तूल हल्ल्याच्या वेळी जॅम झाली आणि त्यातून दोन जिवंत काडतूसं न उडताच बाहेर पडली. सूत्रांनी सांगितले की, हल्ल्याच्या वेळी फूल सिंगने देशी बनावटीच्या पिस्तूलातून गोळ्या झाडल्या होत्या.
मुंबई गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आले आहे की, गोळीबार करणाऱ्यांची मूळ योजना सुरतहून बसने दिल्लीला जाण्याची आणि त्यानंतर नेपाळ सीमेपलीकडे निघून जाण्याची होती. मात्र, ते बस स्थानकावर पोहोचले तेव्हा बस निघून गेल्यामुळे त्यांची ही योजना फसली.
बस चुकल्यानंतर, या कटाचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा अनिल पंडित याने 'प्लॅन बी' अंमलात आणला. त्याने अटक करण्यात आलेल्या अंकित खटक या दुसऱ्या आरोपीच्या माध्यमातून गोळीबार करणाऱ्यांना नवीन सूचना दिल्या. यानंतर, तिन्ही आरोपी रिक्षाने सुरत रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि पहाटे 1.33 च्या सुमारास पुणे-जयपूर एक्सप्रेसमध्ये चढले. रेल्वे प्रवासादरम्यान पोलिसांकडून तपासणी होऊ शकते, या भीतीने त्यांनी ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी गोळीबारात वापरलेली दोन शस्त्रे आणि दारूगोळा सूरत बस स्थानकाजवळील एका मोकळ्या जागेत लपवून ठेवले होते.
रेल्वेमध्ये चढण्यापूर्वी, त्यांनी गोळीबारात वापरलेली दोन शस्त्रे आणि दारूगोळा सुरत बस स्थानकाजवळील एका मोकळ्या जागेत लपवून ठेवले होते; कारण त्यांना रेल्वे प्रवासादरम्यान पोलिसांकडून तपासणी होण्याची भीती होती. 'प्लॅन बी' (Plan B) अंतर्गत, त्यांना जयपूरच्या बाहेरील मुख्य रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच रेल्वेतून उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांची योजना रेल्वे मार्ग सोडून, बस किंवा टॅक्सीची व्यवस्था करून, रस्तेमार्गे दिल्लीच्या दिशेने जाण्याची आणि त्यानंतर नेपाळची सीमा ओलांडण्याची होती. मात्र, मुंबई गुन्हे शाखेने सुरत बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला. याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे.