गेल्या काही वर्षात मराठी मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये अनेक नवीन आणि उत्तम चित्रपट येत आहेत. असाच एक चित्रपट आज महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. त्याच नाव आहे सोहळा! ‘सोहळा’ हा असाच एक साधा, संवेदनशील आणि मातीशी नातं सांगणारा चित्रपट आहे. अभिनेत्री सोनाली बेंद्रे या चित्रपटाच्या सादरकर्त्या असून रोझ ऑडिओ व्हिज्युअल्स अँड कॅरीऑन फिल्म्स यांच्या निर्मितीतून साकारलेली ही कथा एका तेरा वर्षांच्या मुलाभोवती फिरते. मराठी चित्रपटसृष्टीत कौटुंबिक नात्यांमधील भावविश्व उलगडणारे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करतात हेच या चित्रपटातून दिसून येत आहे. महाराष्ट्रीय परंपरेतील एका महत्त्वाच्या विधीच्या पार्श्वभूमीवर उलगडणारा हा चित्रपट केवळ एका सोहळ्यापुरता मर्यादित राहत नाही. तर हा सिनेमा वडील आणि मुलामधील नातं, बालपणातून मोठेपणाकडे होणारा प्रवास आणि आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची ताकद अशा अनेक भावनांना तो स्पर्श करतो.
कथा आणि पटकथा कशी आहे?
‘सोहळा’मध्ये त्यांच्या कथेत त्याचा साधेपणा दिसून येतो. गावाकडचं जीवन, कौटुंबिक संस्कार, परंपरा आणि सत्य परस्थिती यांचं चित्रण करताना चित्रपट कुठेही अनावश्यक नाट्यमय वळणांचा आधार घेत नाही. त्यामुळे अनेक प्रसंग प्रेक्षकांना सहज आपलेसे वाटतात. कथा सहज पुढे जाते. या चित्रपटाचं मूळ हे
वडील आणि मुलामधील भावनिक नातं यावर आहे. मुलाची निरागसता आणि परिस्थितीशी झुंज देताना त्याच्यात निर्माण होणारा प्रसंग हे कथेतून हळूहळू समोर येतात. छोट्या प्रसंगांमधून फार मोठ्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मराठी संस्कृतीचं उत्तम चित्रण
लेखक-दिग्दर्शक सैकत भगबान यांनी चित्रपटात मानवी भावनांना केंद्रस्थानी ठेवलं आहे. त्यानुसारच संपूर्ण चित्रण झाला आहे. महाराष्ट्रीय परंपरा, कौटुंबिक वातावरण आणि ग्रामीण जीवनशैली यांचं चित्रण उत्तमपणे दर्शवण्यात आलं आहे. चित्रपटातील पात्रांच्या भावना आणि त्यांच्यातील नातेसंबंध उलगडताना दिग्दर्शक संयम राखलेला दिसला. यामुळे प्रेक्षकांना पात्रांच्या भावविश्वाशी जोडून घेता येतं.
बालमानसाचा संवेदनशील वेध
या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेरा वर्षांच्या पश्याच्या मानसिक विश्वाचं चित्रण उत्तमरीत्या मांडलेलं आहे. वयाने लहान असलेल्या मुलाला जेव्हा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, तेव्हा त्याच्या मनात निर्माण होणारी भीती, संभ्रम आणि आशा यांचा प्रवास चित्रपटातून पाहायला मिळतो. पश्याची सोहळ्यातील कथा ही केवळ एका पारंपरिक विधीची गोष्ट नाही. प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सावरणं, मनात आशा जिवंत ठेवणं आणि आयुष्याच्या आव्हानांना सामोरं जाणं, या गोष्टीही त्यातून अधोरेखित होतात. याच भावनिक प्रामाणिकपणामुळे ‘सोहळा’ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही.
कलाकारांची दमदार कामगिरी, सहज अभिनय
प्रवीण दळिंबकर यांनी पश्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयात सहजता जाणवते. देवदत्त घोणे या बालकलाकाराने साकारलेला पश्याही लक्षात राहतो. तेरा वर्षांच्या मुलाची निरागसता, मनातील घालमेल आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न त्यांनी चांगल्या प्रकारे मांडला आहे. त्यांच्या अभिनयामुळे पात्राच्या भावनिक प्रवासाला विश्वासार्हता मिळते. वर्षा मालवडकर, अलेस्सांद्रा व्हेलन मेरेडिझ आणि वैष्णवी संजय घोडके यांनीही आपल्या भूमिकांना चोख बजावल्या आहेत. सहाय्यक कलाकारांच्या कामामुळे कथेला आवश्यक भावनिक आधार मिळतो आणि प्रसंगांचा परिणाम अधिक प्रभावी होतो.
‘सोहळा’ पाहावा का?
‘सोहळा’ हा काही नवा प्रयोग केलेला चित्रपट नाही. मात्र, त्याची खरी ताकद नात्यांमधील आपुलकी, परंपरेशी असलेलं नातं आणि कठीण परिस्थितीतून उभं राहण्याची जिद्द यात आहे. तुम्हाला मोठ्या आवाजातील मनोरंजन, वेगवान कथानक आणि सतत घडणाऱ्या नाट्यमय घटना आवडत असतील, तर हा चित्रपट काहीसा संथ वाटू शकतो. मात्र, शांतपणे उलगडणारी कथा, कौटुंबिक भावना आणि मराठी संस्कृतीशी जोडलेले विषय आवडत असतील, तर ‘सोहळा’ला नक्कीच संधी देता येईल.
कुटुंब, संस्कार आणि माणसांमधील नात्यांवर आधारित संवेदनशील चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर ‘सोहळा’ हा वीकेंडसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.