'तुम्हाला साधं बोलायला जमेना, गाणं काय गाणार?', दलेर मेहंदीवर संतापले कॅबिनेट मंत्री; थेट स्टेजवर जाऊन सुनावलं, VIDEO व्हायरल
एका कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पंजाबी गायक दलेर मेहंदी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यांची स्थिती पाहून कॅबिनेट मंत्री त्यांच्यावर संतापले आणि मंचावर जाऊन खडेबोल सुनावले.
उत्तराखंडमधील टिहरी येथील नरेंद्र नगरमध्ये सुरू असलेल्या 50 व्या 'कुंजापुरी पर्यटन आणि विकास मेळाव्या'त काहीसा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पंजाबी गायक दलेर मेहंदी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यांची स्थिती पाहून कॅबिनेट मंत्री त्यांच्यावर संतापले आणि मंचावर जाऊन खडेबोल सुनावले. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान दलेर मेहंदी नशेत असताना सादरीकरण करण्यासाठी मंचावर आले होते असा दावा सोशल मीडियावर काही युजर्स करत आहेत.
लाइव्ह परफॉर्मन्ससाठी पोहोचले होते दलेर मेहंदी
18 ऑक्टोबरच्या रात्री पंजाबी गायक दलेर मेहंदी जत्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण करण्यासाठी पोहोचले होते. मंचावर रोषणाई केली जात असताना आणि त्यांचे सादरीकरण सुरू होणार असतानाच, कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल अचानक मंचावर आले, त्यांनी माईक हातात घेतला आणि दलेर मेहंदी यांना सुनावण्यास सुरुवात केली. "जर तुम्हाला नीट बोलताही येत नसेल, तर तुम्ही गाणार कसे? हा कुंजापुरी मेळा आहे, काही खाजगी कार्यक्रम नाही," असे ते बोलत असल्याचे व्हिडीओत ऐकू येत आहे.
व्हिडीओत नेमके काय?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल दलेर मेहंदी यांना सर्वांसमोर सुनावताना दिसत आहेत. "तुम्हाला इथे आणण्यासाठी आम्ही मोठी रक्कम दिली आहे. तुम्ही नशेत आहात आणि लोकांची फसवणूक करत आहात. तुम्ही गाण्यासाठी मिक्सरचा वापर करत आहेत, हे चुकीचे आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रतिष्ठेचा आदर राखायला हवा. तुम्ही एक मोठे व्यक्ती असल्यानेच आम्ही तुम्हाला आमंत्रित केले होते. तुम्ही नीट बोलूही शकत नाही, गाण्याचा तर प्रश्नच येत नाही. हे अजिबात योग्य नाही," अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
"तुम्हाला नीट बोलताही येत नाही, मग तुम्ही गाणार कसे?", अशा शब्दांत त्यांनी सुनावले. यादरम्यान दलेर मेहंदी शांत उभे होते आणि मधे मधे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी आयोजकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, काही नेटकरी दलेर मेहंदी नशेत होते असा दावा करत आहेत. नशेत असल्याने त्यांना नीट बोलताही येत नव्हते, यामुळे कॅबिनेट मंत्री संतापले असा दावा ते करत आहेत. मात्र, या घटनेबाबत मंत्री किंवा गायक यांच्यापैकी कोणाकडूनही कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.
प्रेक्षकांच्या नाराजीमुळे कॅबिनेट मंत्री मंचावर चढले
दरम्यान, दलेर मेहंदी यांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी सांगितले की, त्यांनी एक-दोन गाणी गायली आणि नंतर प्री-रेकॉर्डेड ट्रॅक वाजू लागला, ज्यामध्ये दुसऱ्या कोणाचा तरी आवाज होता. आपली फसवणूक झाल्याचे जाणवताच, प्रेक्षकांनी निषेध नोंदवत आरडाओरडा सुरू केला. स्थानिकांची ही नाराजी पाहून संतप्त झालेले कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल स्वतःला रोखू शकले नाहीत आणि थेट मंचावर चढले आणि सुनावले.