अमेरिकेतील मियामी विमातळावर मोठी दुर्घटना घडली आहे. मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांची एकमेकांशी धडक झाली. महत्त्वाचं म्हणजे, दुर्घटनेच्या आदल्या दिवशी, संपूर्ण अमेरिकेत विमान उड्डाणं थांबवण्यात आल्यामुळे मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती आणि लाखो प्रवासी विविध विमानतळांवर अडकून पडले होते. रात्री 9.15 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पनामा सिटीहून 166 प्रवासी आणि सहा कर्मचारी घेऊन येणाऱ्या 'कोपा एअरलाईन्स'च्या बोईंग 737 विमानाच्या पंखांचे टोक, टॅक्सीवेवरून जात असलेल्या 'युपीएस' (UPS) कंपनीच्या बोईंग 767 मालवाहू विमानाच्या पुढच्या भागावर आदळले. या दुर्घटनेत दोन व्यक्ती जखमी झाल्याची माहिती 'कोपा एअरलाईन्स'ने दिली आहे.
कोपा एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार, "विमान टर्मिनलवर पोहोचले असून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आहे. त्यापैकी दोन प्रवाशांना विमानतळावरील वैद्यकीय पथकाकडून उपचार देण्यात आले; प्राथमिक माहितीनुसार त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे." इतर सर्व प्रवासी आणि सहा कर्मचारी सुरक्षित असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचेही विमान कंपनीने सांगितले आहे.
कोपा एअरलाईन्सचे प्रवासी सीझर फरेरा यांनी सीएनएनला सांगितले, "आम्ही लँडिंगनंतर सामान्य वेगाने टॅक्सी करत होतो, तेव्हा अचानक मला माझ्या आजूबाजूच्या लोकांचे आवाज वाढल्याचे ऐकू आले. त्यानंतर, सर्वजण एकदम ओरडले आणि त्याच क्षणी दुसरे एक विमान आमच्या विमानावर आदळले."
विमानातील केबिनमध्ये आम्हाला जाणवले की, विमान अचानक एका बाजूला जोरात झुकले. काही प्रवासी सुरुवातीला घाबरले होते, परंतु कर्मचाऱ्यांनी आम्हाला आपापल्या जागेवर बसून राहण्याच्या सूचना दिल्या. एफएए (FAA) ने सांगितले की, एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सनी यूपीएस (UPS) च्या कर्मचाऱ्यांना कोपा एअरलाईन्सच्या विमानाला मार्ग मोकळा करून देण्यास सांगितले होते. सध्या ही संस्था या धडकेची चौकशी करत आहे.
यूपीएसने म्हटले आहे की, नेमके काय घडले हे शोधण्यासाठी ते संबंधित अधिकाऱ्यांसोबत काम करत आहेत. कोपा एअरलाईन्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे, "या घटनेमुळे आमच्या प्रवाशांना जो त्रास झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमच्या प्रवाशांची आणि कर्मचारी वर्गाची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि आम्ही तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य देऊ." ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा देशभरातील विमानतळ पुन्हा एकदा सामान्य विमान सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.