सोमवारी रात्री उशिरा इंडोनेशियामधील जावा प्रांतातील एका सोन्याच्या खाणीत विचित्र अपघात घडला आहे. या ठिकाणी खाणकामगार सोनं शोधत असताना, मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचं पाणी थेट खाणीत घुसलं. पश्चिम जावा प्रांतातील बोगोर रीजेंसीमधील 'सिसेरुह' नदीला पावसामुळे पूर आला आणि त्याचे पाणी खाणीसाठी खणलेल्या बोगद्यात शिरल्याने हा अपघात झाला. ही सुमारे 100 मीटर (330 फूट) खोल खाण, राजधानी जकार्ताच्या दक्षिणेकडील डोंगराळ भागात आहे. या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण अजूनही खाणीत अडकल्याचं सांगितलं जात आहे.
11 जण बाहेर पडले
पश्चिम जावा पोलीस दलाचे प्रवक्ते हेंद्रा रोचमावान यांनी या दुर्घटनेबद्दल माहिती दिली. खाणीत पाणी भरण्यापूर्वी 11 कामगार तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी, स्थानिक खाण कामगार आणि रहिवाशांनी स्वतःहून तिथून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, असं हेंद्रा रोचमावान म्हणाले. हे कामगार बेकायदेशीरपणे खाणकाम करत असल्याने, त्यांनी तातडीने प्रशासनाला याची माहिती दिली नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
कोणालाही द्यायची नव्हती अपघाताची माहिती
बोगोर आपत्ती निवारण संस्थेचे आपत्कालीन आणि लॉजिस्टिक प्रमुख मुहम्मद आदम हमदानी खाण बेकायदा असल्याच्या भीतीने आमच्यापर्यंत लवकर माहिती आली नाही असं म्हटलं आहे. "समस्या अशी होती की, हे काम बेकायदेशीर असल्याने कोणीही या अपघाताची माहिती आम्हाला वेळेत दिली नाही. विशेष म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही या अपघाताची माहिती द्यायचीही नव्हती," असं हमदानी म्हणाले.
16 तासांनी मिळाली माहिती
पोलीस प्रवक्ते रोचमावान यांनी, पूर आल्यानंतर सुमारे 16 तासांनी खाणीत अडकलेल्या कामगारांबाबत पोलिसांना पहिली माहिती मिळाली. स्थानिक अधिकारी, अग्निशमन दल आणि इतर संस्थांकडून प्राथमिक पाहणी केल्यानंतर, सरकारी मालकीच्या 'पीटी अंताम' या खाण कंपनीने बुधवारी मध्यरात्रीनंतर 'जकार्ता सर्च अँड रेस्क्यू एजन्सी'कडे अधिकृत अहवाल सादर केला. त्यानंतर तातडीने मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले.
बाचवकार्यात अडथळे काय?
शोध आणि बचाव पथकाने खाणीतील पाणी बाहेर काढण्यासाठी सबमर्सिबल म्हणजेच पाण्यात बुडवल्यानंतरही चालणारे पंप वापरले आणि ज्या ठिकाणांहून पाणी खाणीत येत होते, ते मार्ग बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 'जकार्ता सर्च अँड रेस्क्यू एजन्सी'च्या प्रमुख डेसियाना कार्तिका बहारी यांनी, "खाणीतील पाणी अजूनही ओसरलेले नाही आणि ते पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे," असं सांगितलं. पाण्याची उच्च पातळी, अरुंद प्रवेशमार्ग, निसरडी जमीन आणि अपुरा प्रकाश यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती डेसियाना कार्तिका बहारी यांनी दिली. या शोध मोहिमेत आपत्कालीन कर्मचारी, पोलीस, लष्करी जवान, आरोग्य अधिकारी आणि स्वयंसेवकांसह एकूण 325 बचावकर्ते सहभागी आहेत.
30 ते 70 मीटर खोलीवर सापडले मृतदेह
मदतकार्य सुरु झाल्यानंतर दुपारी काही वेळातच पहिला मृतदेह सापडला, तर त्यानंतर सुमारे एका तासाने आणखी दोन मृतदेह आढळले. बुधवारी संध्याकाळपर्यंत बचाव पथकांनी दोन लगतच्या खाणींमधून एकूण सहा मृतदेह बाहेर काढले. हे सर्व नऊ जण 30 ते 70 मीटर खोलीवर मृत अवस्थेत सापडले, असे बहारी यांनी सांगितले. पाण्याने भरलेली ही खाण 'पीटी अंताम'च्या पोंगकोर सुवर्ण खाण प्रकल्पाच्या सुविधांजवळ होती, परंतु कंपनीने स्पष्ट केले की, ही घटना एका अनधिकृत खाणीत घडली असून तिचा कंपनीच्या कामकाजाशी कोणताही संबंध नाही.
...म्हणून आम्ही मदत करतोय; 'पीटी अंताम'चं स्पष्टीकरण
आमचे सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कंपनीचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहे, असं अंतामने सांगितले. तसेच, कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पोंगकोर परिसरातील बेकायदेशीर खाणकामाच्या ठिकाणांपर्यंतचा प्रवेश अनेकदा बंद केला आहे. तसेच, अनधिकृत खाणकाम रोखण्यासाठी कंपनी गस्त घालणे, ड्रोनचा वापर करणे आणि पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांची मदत घेणे यांसारखे उपाय राबवते. "मानवतावादी दृष्टिकोनातून, अंताम शोध आणि बचाव कार्यामध्ये मदत करत आहे," असं 'पीटी अंताम'चे प्रवक्ते विष्णू दानंदी हरयांतो यांनी स्पष्ट केलं.
खाणकामगारांच्या समस्या
इंडोनेशियामध्ये बेकायदेशीरपणे खाणकाम मोठ्या प्रमाणावर चालते, ज्यामुळे हजारो लोकांना अत्यंत असुरक्षित असा उदरनिर्वाहचा पर्याय मिळतो. भूस्खलन, पूर आणि बोगदे कोसळणे हे खाण कामगारांना भेडसावणाऱ्या धोक्यांपैकी काही आहेत. सोन्याच्या धातूवर प्रक्रिया करण्याच्या बहुतांश कामात अत्यंत विषारी पारा आणि सायनाइडचा वापर होतो आणि कामगार अनेकदा अगदी कमी किंवा कोणतेही संरक्षण न वापरता या बेकायदेशीर खाणींमध्ये काम करतात.