‘AI मानवजातीला संपवणार!’ एआयचे जनक जेफ्री हिंटन यांचा जगाला गंभीर इशारा; पुढील 3 वर्षात असं काय घडणार?
AI चे जनक जेफ्री हिंटन यांनी टोरंटोमधील कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्यांबाबत चिंता व्यक्त केली. सुपरइंटेलिजन्स, मानवावरील नियंत्रण, नोकऱ्या आणि AI नियमनाबाबत त्यांनी काय इशारा दिला? जाणून घेऊया.
सध्या जगभरात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. प्रत्येक गोष्टीसाठी मनुष्य एआयची मदत घेतोय. पण एआय हा मानवजातीच्या मुळाशी उठला तर? एका शक्यतेनेच भीती वाटू लागते. पण हा दावा एका बड्या व्यक्तीने केलाय. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे नोबेल पुरस्कार विजेते जेफ्री हिंटन यांनी पुन्हा एकदा गंभीर इशारा दिलाय. त्यांच्या या इशाऱ्यामुळे एआयच्या गांभीर्याची जगभरात चर्चा होऊ लागलीय. जेफ्री हिंटन यांनी नेमकं काय म्हटलंय? याचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो? सविस्तर जाणून घेऊया.
काय दिलाय इशारा?
टोरंटो येथे झालेल्या ‘हिंटन लेक्चर्स’ कार्यक्रमात त्यांनी एआयच्या वाढत्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली. एआय तंत्रज्ञानाचा विकास ज्या वेगाने सुरू आहे, त्या तुलनेत त्यावर नियंत्रण ठेवण्याचे उपाय पुरेसे विकसित झालेले नाहीत. भविष्यात एआय माणसांपेक्षा अधिक बुद्धिमान झाले, तर त्याला मानवी नियंत्रणाखाली ठेवणे मोठे आव्हान ठरू शकते, असा त्यांचा इशारा आहे.
पुढील तीन वर्षांत एआय नियंत्रणाबाहेर?
या कार्यक्रमात हिंटन यांच्यासोबत एआय सुरक्षा क्षेत्रातील संशोधक पॉल क्रिस्टियानो यांनीही चिंता व्यक्त केली. एआय माणसांच्या नियंत्रणाबाहेर जाण्याचा मोठा धोका पुढील तीन वर्षांत निर्माण होऊ शकतो, असे क्रिस्टियानो यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. काही परिस्थितींमध्ये पुढील सहा ते बारा महिन्यांतही गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, असा त्यांचा अंदाज आहे.
एआय स्वतःच स्वतःला अधिक सक्षम बनवू लागले तर?
एआय क्षेत्रातील सर्वात मोठ्या चिंतांपैकी एक म्हणजे ‘सेल्फ इम्प्रूव्हमेंट’. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता स्वतःच्या क्षमतांमध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतःच काम करू लागणे. सध्या एआय च्या मदतीने कोडिंग, संशोधन आणि तांत्रिक कामांचा वेग वाढतोय. भविष्यात अधिक प्रगत एआय स्वतःहून पुढील अधिक सक्षम प्रणाली विकसित करू लागले, तर त्याचा विकास मानवी नियंत्रणापेक्षा वेगाने होण्याची शक्यता आहे.
वीजपुरवठा आणि बँकिंग यंत्रणेला सायबर हल्ल्याचा धोका
यापूर्वी 3 नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत हिंटन यांनी एआयमुळे मोठ्या प्रमाणावर संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली होती. एआयच्या मदतीने वीजपुरवठा यंत्रणेवर सायबर हल्ला होऊ शकतो किंवा जागतिक आर्थिक व्यवस्थेवर परिणाम करणारा हल्ला होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
एआय कंपन्यांवर सरकारी नियंत्रण आणि कठोर नियम?
एआय कंपन्या तंत्रज्ञान विकसित करण्याच्या स्पर्धेत सुरक्षिततेकडे पुरेसे लक्ष देत नसल्याची हिंटन यांची चिंता आहे. त्यामुळे एआय प्रणाली सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्यापूर्वी स्वतंत्र संस्थेकडून त्यांची सुरक्षा तपासली जावी, अशी त्यांची भूमिका आहे. औषधांना बाजारात आणण्यापूर्वी जशी नियामक तपासणी होते, तशीच व्यवस्था एआय साठीही असावी, असे त्यांनी सुचवले आहे.