कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर आता जवळपास प्रत्येक क्षेत्रात वाढत आहे. मात्र एआयवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहणे एखाद्या कर्मचाऱ्याला महागात पडू शकते का?, असा प्रश्न उपस्थित करणारा एक ई-मेल सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या कथित ई-मेलनुसार, ओपन एआय या आघाडीच्या एाय कंपनीने आपल्या एका लीड सॉफ्टवेअर इंजिनिअरला तातडीने नोकरीवरून काढले. या कर्मचाऱ्याचे वार्षिक पॅकेज 3 लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 2.8 कोटी रुपये होते.
व्हायरल ई-मेलमध्ये इंजिनिअरच्या कामाच्या पद्धतीवर तीन प्रमुख आक्षेप घेण्यात आला. त्यानुसार, कर्मचारी स्वतः कोड लिहिण्याऐवजी अँथ्रोपिक कंपनीच्या क्लाऊड एआय टूलकडून कोड तयार करून घेत होता. त्यानंतर तो कोड नेमका कसा काम करतो, हे समजून घेण्यासाठी चॅट जीपीटीची मदत घेत असे. कोडमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी गुगलच्या जेमिनी या एाय टूलचा वापर करायचा. म्हणजेच एका एआयने तयार केलेले काम दुसऱ्या एआयकडून समजून घेणे आणि तिसऱ्या एआयकडून त्यातील चुका दुरुस्त करून घेणे, अशी ही कथित कार्यपद्धती होती.
कथित ई-मेलमधील सर्वात चर्चेचा भाग म्हणजे कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याचा उल्लेख आहे. अशा वेळी इंजिनिअरने स्वतः समस्या सोडवण्याऐवजी चॅट जीपीटीला ती दुरुस्त करण्याची विनंती केली. परिस्थिती हाताळण्यासाठी त्याने एआयला दिलेला प्रॉम्प्टही ई-मेलमध्ये नमूद आहे. यानंतर कर्मचाऱ्याचा कंपनीतील प्रवेश त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता बंद केला जाणार असल्याचे कथित पत्रात लिहिले होते.
हा ई-मेल X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @goldtooth.exe या अकाउंटवरून शेअर झाला. पोस्टला लाखो व्ह्यूज मिळाल्यानंतर ती अधिकृत बडतर्फीची नोटीस असल्याच्या दाव्याने वेगवेगळ्या भाषांमध्ये पसरली. मात्र या ई-मेलची सत्यता सिद्ध झालेली नाही. ओपन एआयने अशा कोणत्याही कर्मचाऱ्याला या कारणासाठी नोकरीवरून काढल्याची घोषणा केलेली नाही. संबंधित कर्मचाऱ्याची ओळखही समोर आलेली नाही. काही फॅक्ट-चेक अहवालांनुसार, मूळ पोस्ट विनोदी किंवा काल्पनिक स्वरूपाची होती आणि नंतर तिचा संदर्भ बदलून ती खरी घटना असल्याप्रमाणे पसरवण्यात आल्याचे समोर आले आहे.
या व्हायरल चर्चेमुळे सॉफ्टवेअर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या बदलत्या भूमिकेचा मुद्दा पुढे आला आहे. आजच्या युगात कोडिंग, डेटा विश्लेषण, कंटेंट निर्मिती आणि तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी एआयचा वापर वाढतोय. मात्र एआयने तयार केलेला मजकूर किंवा कोड योग्य आहे की नाही? हे तपासण्याची क्षमता माणसाकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात केवळ AI वापरता येणे पुरेसे ठरणार नाही, तर AI च्या कामाचे मूल्यमापन करण्याचे कौशल्यही महत्त्वाचे ठरेल, असे तज्ज्ञ सांगतात.