आता जगासमोर Shamonda Virus संकट! गुरांमधून मानवामध्ये पसरू लागला, एकाचा मृत्यू; 14 देशांमध्ये प्रादुर्भाव, लक्षणं कोणती? WHO चं म्हणणं काय?
2019 मध्ये ज्याप्रकारे अचानक वटवाघुळांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग सुरु झाला होता त्याचप्रकाराची आठवण करुन देणारी एक घटना फ्रान्समध्ये घडली असून सध्या जगभर या विषयाचीच चर्चा आहे. नेमक्या कोणत्या विषाणूची मानवाला पहिल्यांदाच लागण झाली आहे जाणून घ्या...
चीनमधील वुहानमधून 2019 च्या डिसेंबर महिन्यामध्ये वटवाघळांच्या माध्यमातून मानवाला संसर्ग होऊन कोरोना विषाणू जगभर पसरला. या विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात पुढील दोन वर्षांमध्ये 70 लाखांहून अधिक लोकांना प्राण गमवावा लागला. या संसर्गामधून सावरण्यासाठी जगाला अनेक वर्ष लागली असून आता कुठे अनेक ठिकाणी गाडी रुळावर येत असतानाच फ्रान्समधून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. प्राण्यांमधून मानवाला यापूर्वी कधीही संसर्ग न झालेल्या एका विषाणूची मानवाला लागण झाल्याचं प्रकरण पहिल्यांदाच समोर आलं आहे. अगदी कोरोना ज्याप्रमाणे पहिल्यांदा वटवाघळांमधून मानवी शरीरामध्ये पोहोचला तशाचप्रकारे आता गायी-म्हशींना होणारा एक विचित्र आजार मानवामध्ये परत असल्याचं पहिलं प्रकरण समोर आल्याचं वृत्त 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
नक्की हा विषाणू कोणता?
हा सारा प्रकार फ्रान्समध्ये घडला आहे. येथे 'शामोंडा' विषाणूचा मानवाला पहिल्यांदा संसर्ग झाल्याचं दिसून आलं आहे. 'शामोंडा'चा हा पहिला ज्ञात मानवी संसर्ग असून हा विषाणू सामान्यतः पाळीव जनावरांमध्ये दिसून येतो. 'शामोंडा'ची लागण झालेल्या रुग्णाचा रुग्णालयात मृत्यू झाला. फ्रान्सच्या पूर्व भागात हा विषाणू या वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात पसरला. गायी, म्हशी यासारख्या पाळीव प्राण्यांमध्ये सुरुवातीला हा विषाणू पसरला होता. याच भागात विषाणू वाहून नेणाऱ्या एका 'मिज'ने (लहान माशीसदृश कीटक) बाधित जनावराला चावा घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला चावा घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फ्रेंच आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने, संबंधित व्यक्तीला एका वेगळ्या गंभीर आजारामुळे लिऑनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याचा संसर्ग होऊ शकतो का?
फ्रान्समधील स्थानिक वृत्तपत्र 'ले प्रोग्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, मयत व्यक्ती 60 वर्षांची होती. एकाचा मृत्यू झाला असला तरी 'शामोंडा' हा फारसा संसर्गजन्य नाही. त्यामुळेच सामान्य जनतेला कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. फ्रान्सच्या आरोग्य संचालनालयाचे प्रमुख ग्रेगरी एमरी यांनीही सदर प्रकरणासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. "ही एक अभूतपूर्व घटना आहे. वैज्ञानिक आणि विषाणूशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास हे असं पहिल्यांदाच घडलं आहे. मयत व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती अत्यंत कमकुवत असल्याने त्याचा मृत्यू झाला आहे," असं एमरी म्हणाले.
जागतिक आरोग्य संघटनेनं काय म्हटलं?
सदर प्रकरण समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) फ्रेंच अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असल्याची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य समस्या आणि आणीबाणीच्या प्रसंगी समन्वयाचे काम करणाऱ्या 'डब्ल्यूएचओ'ने, "सध्याचा तपशील आणि संबंधित विषाणूंच्या प्रसाराबाबतच्या ज्ञात माहितीनुसार, ही एक स्वतंत्र घटना आहे. सध्या तरी याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची शक्यता कमी आहे," असं म्हटलंय.
शामोंडासंदर्भात थोडक्यात
शामोंडा हा कीटकांच्या माध्यमातून तयार होणारा विषाणू आहे. हा विषाणू 'ऑर्थोबुनिया' या जैव गटातील आहे. 'सिम्बू सेरोग्रुप' मधील एक आरएनएवरआधारित हा विषाणू आहे. 1960 च्या दशकात नायजेरियामधील गुरांमध्ये सर्वात आधी 'शामोंडा' विषाणू आढळून आला होता. त्यानंतर आफ्रिकेचे काही भाग आणि जपानमध्ये हा विषाणू तुरळक प्रमाणात आढळला होता. या वर्षीच्या युरोपियन समरमध्ये हा विषाणू पहिल्यांदाच पश्चिम युरोपमध्ये पसरला. यात प्रामुख्याने जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि नेदरलँड्ससह 14 देशांचा समावेश आहे. या देशांमधील प्राण्यांमध्ये शामोंडा वेगाने पसरला असून त्याचा प्रादुर्भाव वाढला आहे.
संसर्ग कसा होतो? काय लक्षणं दिसतात?
हा विषाणू प्रामुख्याने 'क्युलीकॉइड्स मिज' नावाच्या अत्यंत लहान आकाराच्या चावणाऱ्या माश्यांद्वारे प्राण्यांमध्ये पसरतो. आपल्याकडील गोचीडीसारखा हा प्रकार आहे. हा संसर्ग थेट एका जनावराकडून दुसऱ्या जनावराला होता. आतापर्यंत याचा संसर्ग जनावराकडून माणसांमध्ये होत नाही असं मानलं जात होतं. मात्र हा समज आता खोटा ठरला आहे. हा विषाणू मुख्यत्वे गायी आणि म्हशींबरोबरच शेळ्या, मेंढ्या आणि घोड्यांमध्ये संक्रमित होतो. संसर्ग झालेल्या जनावरांना तीव्र ताप येतो. जनावरं सुस्त होतात आणि त्यांना अतिसार (डायरिया) यासारखा त्रास होतो. गुरं असलेल्यांसाठी धक्कादायक बाब म्हणजे संसर्ग झालेल्या जनावरापासून होणाऱ्या दूध उत्पादनात लक्षणीय घट होते.