23व्या वर्षी कसे बनले 40 हजार कोटींचे मालक? भारतीय वंशाच्या 2 तरुणांचा जगभरात वाजतोय डंका; कारणही तसंच!
23व्या वर्षी कसे बनले 40 हजार कोटींचे मालक? भारतीय वंशाच्या 2 तरुणांचा जगभरात वाजतोय डंका; कारणही तसंच!
भारतीय वंशाचे आदर्श हिरेमठ आणि सूर्या मिधा या दोन तरुण उद्योजकांनी जागतिक टेक उद्योगात मोठी झेप घेतली आहे. त्यांच्या ‘मर्कोर’ या एआय स्टार्टअपचे मूल्यांकन 20 अब्ज डॉलर म्हणजेच अंदाजे 1.88 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीच्या प्रत्येक सहसंस्थापकाची संपत्ती सुमारे 4.2 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 40 हजार कोटी रुपये झाल्याचे फोर्ब्सच्या अंदाजानुसार म्हटलं गेलंय. अवघ्या 23 व्या वर्षी भारतीय वंशाच्या तरुणांना हे कसं शक्य झालं? सविस्तर जाणून घेऊया.
हार्वर्ड आणि जॉर्जटाउनमधील शिक्षण अर्धवट सोडले
आदर्श हिरेमठ आणि सूर्या मिधा यांची मैत्री अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील बेलारमाइन कॉलेज प्रिपरेटरी या शाळेत झाली. दोघेही शाळेच्या डिबेट टीममध्ये होते. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील तीन प्रमुख पॉलिसी डिबेट स्पर्धा एकाच वर्षात जिंकण्याची कामगिरी केली होती. पुढे सूर्या मिधाने जॉर्जटाउन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फॉरेन सर्व्हिसमध्ये प्रवेश घेतला, तर आदर्शने हार्वर्ड विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण सुरू केले. यानंतर स्वतःची कंपनी उभारण्यासाठी दोघांनीही पारंपरिक शिक्षणाचा मार्ग सोडला. त्यांना उद्योजक पीटर थिएल यांच्या थिएल फेलोशिपचाही लाभ मिळाला.
2023 मध्ये कंपनीची स्थापना
आदर्श हिरेमठ, सूर्या मिधा आणि ब्रेंडन फूडी या तिघांनी 2023 मध्ये मर्कोर ची स्थापना केली. सुरुवातीला ही कंपनी भारतासह विविध देशांतील फ्रीलान्स सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना अमेरिकेतील कंपन्यांशी जोडण्याचे काम करत होती. पुढे कंपनीने एआय क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. आता मर्कोर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना एआय कंपन्यांशी जोडते. डॉक्टर, वकील, फायनान्स आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ज्ञ एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देणे, त्यांच्या उत्तरांची गुणवत्ता तपासणे आणि चुका सुधारण्याचे काम करतात.
कंपनीचे मूल्यांकन 20 अब्ज डॉलरवर
10 नोव्हेंबर 2026 रोजी मर्कोरने 750 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 7 हजार कोटी रुपयांचा सिरिज डी निधी उभारल्याची घोषणा केली. या गुंतवणुकीनंतर कंपनीचे मूल्यांकन 20 अब्ज डॉलर झाले. बेंचमार्क, जनरल कॅटॅलिस्ट, एनव्हिडिया, सेल्सफोर्स, झूम यांसह अनेक गुंतवणूकदारांनी या फंडिंगमध्ये सहभाग घेतला.हा निधी AI मॉडेल्सचे परीक्षण आणि त्यांना अधिक सक्षम बनवण्याच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वापरला जाणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय.
तीन सहसंस्थापकांची संपत्ती जवळपास दुप्पट
मर्कोरचे सीईओ ब्रेंडन फूडी, सीटीओ आदर्श हिरेमठ आणि बोर्ड चेअरमन सूर्या मिधा हे तिन्ही सहसंस्थापक कंपनीत प्रत्येकी अंदाजे 21 टक्के हिस्सेदारी राखतात. फोर्ब्सच्या अंदाजानुसार, ऑक्टोबर 2025 मध्ये कंपनीचे मूल्यांकन 10 अब्ज डॉलर असताना त्यांची संपत्ती प्रत्येकी सुमारे 2.2 अब्ज डॉलर होती. नव्या फंडिंगनंतर हा आकडा 4.2 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचल्याचे फोर्ब्समधून समोर आलंय.