मोस्ट वाँटेड हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक; सलमान, रोहित शर्मा, रणवीर सिंगला धमकावणारा हा गँगस्टर आहे तरी कोण?
अमेरिकेच्या एजन्सीने लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या टोळीचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टरला अटक करण्यात आली आहे.
लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीवर अमेरिकेच्या एजन्सीने मोठी कारवाई करत धक्का दिला आहे. मोस्ट वाँटेड हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तुषार कपूरनेही त्याला हॅरी बॉक्सर कडून धमकी आल्याचे पोलिसांना सांगितलं होतं. बॉलिवूडमधील कलाकारांमध्ये हॅरी बॉक्सरची दहशत आहे. त्याने अभिनेते रणवीर सिंग, रोहित शेट्टी, कपिल शर्मा आणि सलमान खान आणि त्याच्या मेहुण्याला धमकी दिली होती. एवढंच नाही भारतीतील मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना तो पैशांसाठी धमकी द्यायचा. भारतीय तपास यंत्रणांना हॅरी बॉक्सरविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली होती.
गँगस्टर हॅरी बॉक्सर आहे तरी कोण?
हॅरी बॉक्सरचे खरं नाव हरिश्चंद्र असं आहे. तो मूळचा राजस्थानचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो एके काळी भारतीय सैन्य दलात आणि पोलीस दलात भरती होण्यासाठी तयारी करत होता. एवढंच नाहीतर जयपूरमध्ये राहत असताना त्याने बॉक्सिंगचे प्रशिक्षणदेखील घेतले होते. ज्यामुळे त्याचं नाव गुन्हेगारी जगतात हॅरी बॉक्सर असं पडलं.
हॅरी बॉक्सरवर भारतात गंभीर गुन्ह्यांची एक मोठी यादी पाहिला मिळते. दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये त्याच्यावर अनेक आरोप आहेत.तर जयपूर, सीकर, अलवर आणि धोलपूर इथे खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि हल्ला यासारखे अनेक गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॅरी 2024 मध्ये डोंक रूट मार्गे अमेरिकेत पळून गेला होता.
असं म्हणतात की, जेव्हा लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार या दोघात वाद निर्माण झाले तेव्हा लॉरेन्सने टोळीची कमान हॅरी बॉक्सरकडे देण्यात आली. तर हॅरी बॉक्सर हा लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईचा जवळचा मित्र आहे. या टोळीत राहून तो बॉलिवूड आणि व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणे, नेमबाजांना प्रशिक्षण देणे आणि परदेशातून टोळीचा प्रचार करणे या गोष्टी करायचा. तो वारंवार सोशल मीडिया आणि व्हॉइस कॉलचा वापर करत आपली दहशत पसरवत होता.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि हरियाणा स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) कडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री उशिरा अमेरिकी यंत्रणांनी त्याला कॅलिफोर्नियामधून अटक केली आहे. भारतीय यंत्रणा लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नोडल एजन्सी, सीबीआयच्या मदतीने त्याला भारतात आणतील, अशी माहिती समोर येत आहे. हॅरी बॉक्सरच्या अटकेमुळे भारतातील हल्ल्यांची अनेक प्रकरणे सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तर त्याच्याकडून लॉरेन्स बिश्नोई टोळीबद्दलही महत्त्वाची माहिती उघड होऊ शकते.