अमेरिका : अमेरिकेची संरक्षण व्यवस्था जगातील सर्वात मजबूत सुरक्षा व्यवस्था मानली जाते. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या (पेंटागॉन) डेटाबेसवर एक मोठा सायबर हल्ला झाला आहे. ऑक्टोबर 2025 ते जुलै 2026 दरम्यान अनधिकृत वापरकर्त्यांनी डिफेन्स मॅनपॉवर डेटा सेंटर (DMDC) प्रणालीमध्ये प्रवेश केला. या माहितीच्या गळतीमुळे 27.6 लाख जिवंत आणि 29.4 लाख मृत व्यक्तींची वैयक्तिक माहिती उघड झाली आहे. यामध्ये नावे, सोशल सिक्युरिटी क्रमांक, जन्मतारीख, संपर्क तपशील आणि नोकरीचे वर्णन यांसारख्या माहितीचा समावेश आहे.
लीक झालेला डेटा एनक्रिप्ट केलेला नव्हता, त्यामुळे धोका आणखी वाढला. ही त्रुटी लक्षात येताच पेंटागॉनने तात्काळ ती दुरुस्त केली. आतापर्यंत, डेटाच्या गैरवापराचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. बाधित झालेल्यांना एक वर्षासाठी मोफत क्रेडिट मॉनिटरिंगची सुविधा दिली जात आहे. या घटनेमुळे अमेरिकी लष्करी जवानांच्या सुरक्षेबद्दल आणि सायबर सज्जतेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
DMDC या संस्थेमार्फत पेंटागॉनच्या सर्व नोंदींंचा डेटा हातळला जातो. कार्यरत लष्करी कर्मचारी, राखीव सैनिक, नागरी कर्मचारी, कंत्राटदार, निवृत्त, माजी सैनिक आणि लष्करी कुटुंबीयांच्या सर्व डेटाचा समावेश आहे. 6 कोटींहून अधिक नोंदींचा डेटा DMDC संस्थेकडे आहे. या डेटा चोरीमुळे केवळ नावे आणि संपर्कच नव्हे, तर नोकरीचा तपशीलही उघड झाला.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी संवेदनशील मानली जाते, कारण त्यातून लष्करी रचना आणि भूमिका उघड होऊ शकतात. अनधिकृत वापरकर्त्यांची संख्या कमी असल्याचे सांगितले जाते, परंतु दीर्घकाळ मिळालेला प्रवेश प्रणालीमधील एक त्रुटी स्पष्टपणे दर्शवतो. ही त्रुटी जुलै 2026 मध्ये शोधण्यात आली आणि त्वरित दुरुस्त करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या मते, अद्याप कोणताही गैरवापर आढळून आलेला नाही, परंतु धोका कायम आहे.
अशा डेटा गळतीमुळे ओळख चोरी, फिशिंग हल्ले आणि हेरगिरीचाही धोका वाढू शकतो. सामाजिक सुरक्षा क्रमांक आणि जन्मतारीख यांसारख्या माहितीचा वापर बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. लष्करी कर्मचाऱ्यांच्या भूमिका उघड करणाऱ्या नोकरीच्या तपशिलांचा फायदा शत्रू देशांना किंवा हॅकर्सना होऊ शकतो .
पेंटागॉनने बाधित झालेल्यांना ओळख संरक्षण आणि पत देखरेखीची (क्रेडिट मॉनिटरिंगची) सुविधा देऊ केली आहे. तपास सुरू असून सायबर सुरक्षा उपाययोजना अधिक मजबूत केल्या जात आहेत. ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा एफबीआयच्या जॉब्स पोर्टलवरही सायबर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. शाइनीहंटर्स या हॅकिंग गटाने डेटा लीक करण्याची धमकी दिली होती. आतापर्यंत कोणतेही आर्थिक नुकसान किंवा डेटाचा गैरवापर झाल्याचे वृत्त नाही. तथापि, दीर्घकाळासाठी माहिती उपलब्ध राहणार असल्याने भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो.