"अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांत मतदारांनी प्रेसिडंट डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची जागा दाखवली आहे. मतदारांनी दिलेला धक्का एवढा जोरदार आहे की, सत्ताधारी रिपब्लिकन पक्षावर सिनेट आणि ‘हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज्’ या दोन्ही सभागृहांत बहुमत गमावण्याची वेळ आली आहे. या दोन्ही ठिकाणी यापुढे विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्राबल्य असणार आहे. साहजिकच प्रत्येक पातळीवर ट्रम्प यांचा कोंडी करण्याचा प्रयत्न होईल. पूर्वार्धात या महाशयांनी बेफाट निर्णय घेतले. बेलगामपणे सत्ता राबवली. ‘अमेरिका फर्स्ट’ यासारख्या राष्ट्रीय तत्त्वाचा मुलामा ट्रम्प यांनी त्यांच्या निर्णयांना लावला. जगावर ‘टॅरिफ’चा दांडपट्टा फिरवला. त्यामुळे अमेरिकेची सरकारी तिजोरी ओसंडून वाहील आणि अमेरिकेवरील कर्जाचा भार कमी होईल, अशा गमजा केल्या. इराणविरोधात थेट युद्ध करून अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्थेला संकटात ढकलतानादेखील त्यांनी अशाच गर्जना केल्या. मात्र हे सगळेच त्यांच्या अंगलट आले," अशा शब्दांमध्ये 'सामना'च्या अग्रलेखातून अमेरिकेतील ताज्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे. अमेरिकेतील या निकालांचा भारतात कसा परिणाम झालाय आणि होऊ शकतो याबद्दल अग्रलेखातून मतप्रदर्शन करण्यात आलं आहे.
ट्रम्प हे विक्षिप्त गृहस्थ
"ट्रम्प महाशयांची लोकप्रियता तर घसरलीच, परंतु ढासळणारी अर्थव्यवस्था, वाढणारी महागाई, इंधन दर यामुळे सामान्य अमेरिकन जनताही नाराज झाली. त्याचाच वचपा तिने आता मध्यावधी निवडणुकीत काढला आहे. ट्रम्प यांनाही या नाराजीची पूर्वकल्पना होती. म्हणूनच प्रत्येक प्रौढ अमेरिकन नागरिकास पाच हजार डॉलर्स थेट रोख देण्याची ट्रम्प डिव्हिडंड योजना त्यांनी दोन महिन्यांपूर्वी जाहीर केली होती, परंतु अमेरिकन मतदारांनी हा डिव्हिडंड झिडकारला. या निकालांमुळे ट्रम्प यांची खुर्ची किंवा रिपब्लिकन पक्षाची सत्ता लगेच जाईल असे नाही. मात्र आधीच्या दोन वर्षांत ट्रम्प यांनी सत्तेचा जो माज आणि मस्तवालपणा दाखवला तो त्यांना उत्तरार्धात तेवढाच दाखविताना विचार करावा लागेल. अर्थात, ट्रम्प हे विक्षिप्त गृहस्थ आहेत. हा पराभव ते सहजासहजी मान्य करणार नाहीत. त्यामुळेच एकीकडे मध्यावधीचा निकाल स्वीकारण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे, विरोधी डेमोक्रॅटिक पक्षासोबत काम करू असा सूरही त्यांनी काढला आहे. मात्र त्याच वेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना असलेल्या ‘व्हेटो’ या विशेषाधिकाराचीही आठवण विरोधकांना करून दिली आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र मानल्या जाणाऱ्या 'सामना'मध्ये म्हटलं आहे.
...असा नवीन राजकीय संघर्ष दिसू शकतो
"डेमोक्रॅटस्च्या धोरणांना लगाम घालण्यासाठी आपण व्हेटो हे घटनात्मक अस्त्र वापरू, अशी थेट धमकीच त्यांनी दिली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'veto' असे अक्षर कोरलेली प्रसिद्ध लाल रंगाची 'MAGA' टोपी पोस्ट करून आणि इतरांनी मला ‘मिस्टर व्हेटो’ म्हटले तरी चालेल असे जाहीर केले आहे. त्यांच्या ‘व्हेटो’विरोधात डेमोक्रॅटिक पक्ष ‘महाभियोगा’चे अस्त्र वापरू शकतो, परंतु त्यासाठी लागणारे दोन तृतीयांश संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे व्हेटो मोडून काढणे त्यांना सहज शक्य होणार नाही. ट्रम्प यांच्यासारख्या व्यापारी आणि हडेलहप्पी माणसाला हे माहीत आहे. म्हणूनच ते एकीकडे जुळवून घेण्याची आणि दुसरीकडे व्हेटो वापरण्याची भाषा करीत आहेत. ट्रम्प कार्यकाळाचा पूर्वार्ध त्यांच्या एकाधिकारशाहीचा होता. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेला आर्थिक संकटात टाकणारा आणि जागतिक राजकारणात विनाकारण अनेक शत्रू निर्माण करणारा होता. त्याला लगाम घालण्यासाठी अमेरिकन मतदारांनी मध्यावधी निवडणुकीत ट्रम्पविरोधी कौल देत त्यांना जमिनीवर आणले, परंतु ट्रम्प हे विक्षिप्त आहेत. ते ताळ्यावर येतीलच असे नाही. त्यामुळे अमेरिकेच्या राजकीय पटलावर उद्या डेमोक्रॅटिक पक्ष विरुद्ध ट्रम्प यांचा ‘व्हेटो’ असा नवीन राजकीय संघर्ष दिसू शकतो," अशी शक्यताही 'सामना'तून व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय सत्ताधीश तर या दोन्ही मित्रराष्ट्रांचे...
"अमेरिकन संसद राजकीय आखाडा बनलेली दिसू शकते. अर्थात, त्यामुळे अमेरिकन मतदारांनी दिलेला कौल कमी महत्त्वाचा ठरत नाही. मतदारांनी जो सुज्ञपणा गेल्या आठवड्यात इस्रायलमध्ये दाखविला तोच मंगळवारी अमेरिकेत दाखवला. इस्रायल आणि अमेरिका दोन्ही मित्रराष्ट्रे आहेत. या दोन्ही देशांत मतदारांनी सत्तापक्षांना त्यांची जागा दाखवली. त्यांच्या बेलगाम युद्धखोरीला आणि बेबंदशाहीला लगाम घालणारा कौल दिला. भारतीय सत्ताधीश तर या दोन्ही मित्रराष्ट्रांचे ‘माय डिअर फ्रेण्ड’ आहेत. त्यामुळे समझनेवालों को इशारा काफी है! इस्रायल-अमेरिकेत दिवाळीपूर्वीच फटाके फुटले असले तरी त्यांचा धूर भारतात निघणार हे नक्की आहे," असं सूचक विधान लेखाच्या शेवटी करण्यात आलं असून यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यायाने केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीला खोचक चिमटा काढण्यात आला आहे.