दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये पुढील वर्ष कसं असेल? पुढील वर्षी काय काय होऊ शकतं याबद्दलचे अंदाज बांधले जातात. सामान्यपणे यामध्ये चांगल्या गोष्टींबरोबरच काही गोष्टींसंदर्भात इशाराही दिला जातो. मात्र एका जाणकाराने 2027 हे वर्ष करोनापेक्षाही मोठं संकट घेऊन येणारं असेल असं भाकीत केलं आहे. तसेच या वर्षात मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू होतील असंही म्हटलं आहे. नेमकं हे कोणी आणि का म्हटलंय जाणून घेऊयात...
कोणी आणि काय म्हटलंय?
सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये व्हायरल होत असलेली "2027 मध्ये करोनापेक्षाही मोठे संकट येईल आणि मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतील," असं भाकीत एआय सुरक्षा संशोधक निकोला जुर्कोविच यांनी व्यक्त केलं आहे. निकोला जुर्कोविच 'एमईटीआर' (Model Evaluation & Threat Research) नावाच्या संस्थेत तांत्रिक संशोधक म्हणून काम करतात. ही संस्था प्रगत एआय प्रणालींसंदर्भात कोणते धोके आणि जोखीम भविष्यात निर्माण होऊ शकते याबद्दलचा अभ्यास करते. नोव्हेंबर 2026 मध्ये त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (ट्विटर) आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना उद्देशून एक खुले पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी, "जर एआयच्या वेगावर नियंत्रण ठेवले नाही, तर 2027 मध्ये करोना महामारीपेक्षाही भयानक संकट येऊ शकते आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता आहे," अशी भीती व्यक्त केली आहे.
चार प्रमुख गोष्टी घडणार
निकोला जुर्कोविच यांनी 2027 मधील संभाव्य संकटामागे चार मुख्य कारणे सांगितली असून त्यामध्ये अत्यावश्यक सेवांवर सायबर हल्ले होतील, बायोलॉजिकल शस्रांचा वापर होईल आणि अनेक अधिकार एआयवर सोपवले जातील या गोष्टींचा समावेश आहे. तसेच नोकऱ्या आणि अर्थव्यवस्थांवरही एआयचा वाईट परिणाम होईल असा अंदाजही निकोला यांनी व्यक्त केला आहे. एआय प्रणाली मानवी नियंत्रणाबाहेर जाऊन वीज, पाणी, बँकिंग आणि देशाच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमध्ये घुसखोरी करून त्या ठप्प करू शकतात, असं सायबर हल्ल्यांसंदर्भातील चिंता व्यक्त करताना निकोला यांनी म्हटलं आहे. तर समाजकंटक किंवा दहशतवादी प्रगत एआयचा वापर करून घातक जैविक शस्त्रे तयार करू शकतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते, अशी भीतीही बायोलॉजिकल शस्रांचा संदर्भ देताना व्यक्त केली आहे. जागतिक नेते किंवा महत्त्वाचे निर्णय घेणारे लोक निष्काळजीपणे आपले अधिकार एआयच्या हातात सोपवू शकतात, असंही निकोल यांनी म्हटलं आहे. ही गोष्ट भविष्यात मानवासाठी धोक्याची ठरू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील 10 वर्षांत सध्याच्या बहुतांश नोकऱ्या नष्ट होऊन मोठी बेरोजगारी निर्माण होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी आर्थिक संकटासंदर्भात बोलताना व्यक्त केली आहे.
दोन गोष्टी कराच...
आपल्या पत्रात निकोला जुर्कोविच यांनी त्यांच्या कुटुंबाला खबरदारी घेण्यास सांगितले आहे. घरात किमान 14 दिवस (2 आठवडे) पुरेल इतके अन्नधान्य आणि पिण्याचे पाणी साठवून ठेवावे. ऑनलाइन बँकिंग प्रणाली ठप्प झाल्यास अडचण येऊ नये म्हणून घरात पुरेशी रोख रक्कम तयार ठेवावी, असा सल्ला निकोला जुर्कोविच यांनी दिला आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांमध्ये ही पोस्ट चर्चेचा विषय ठरतेय.
https://t.co/ZZutDzEkXQ
— Nikola Jurkovic (@nikolaj2030) November 26, 2026
घाबरण्याचं कारण नाही
अनेकांनी यामुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. हा केवळ एका संशोधकाचा वैयक्तिक अंदाज असून असं काही घडेलच याची शाश्वती नसल्याचं म्हटलं आहे. या इशाऱ्याचा मुख्य उद्देश लोकांमध्ये भीती पसरवणे नसून, एआय कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेवर अंकुश ठेवण्यासाठी जगभरातील सरकारांनी एकत्र येऊन कठोर कायदे आणि सुरक्षा नियम तयार करावेत यासाठी दबाव निर्माण करण्याचा असल्याचा दावा केला जातोय. या दाव्यासंदर्भात अनेक मतमतांतरे आहेत.