SAP Layoff : IT सेक्टरमध्ये मोठा भूंकप येणार आहे. भारतासह 48 देशात काम करणारी जगातील सर्वात मोठी IT कंपनी एकाचवेळी 10,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार आहे. जर्मन सॉफ्टवेअर कंपनी एसएपी (SAP) मध्ये ही मोठी क्रमाचरी कपात होणार आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या वेगाने होणाऱ्या वापरामुळे आपल्या व्यवसाय धोरणात बदल होत असल्याचे कारण देत कंपनीने कंपनीने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. मोठ्या पुनर्रचनेचा भाग म्हणून कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे 10 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. बाजारमूल्यानुसार एसएपी ही युरोपमधील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे.
कंपनीने कर्मचारी कपातीची अधिकृत आकडेवारी किंवा इतर माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. कर्मचारी प्रतिनिधींना अधिकृतपणे अहवाल सादर केला आहे. याविषयावर चर्चा सुरु आहे. एआयचा वाढता प्रभाव आणि आर्थिक दबावांमुळे होणाऱ्या बाजारपेठेतील बदलांच्या पार्श्वभूमीवर कंपनीने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसएपी (SAP) कंपनीत मोठे धोरणात्मक बदल होत आहेत. कंपनी क्लाउड-आधारित सेवांचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. आपल्या सॉफ्टवेअर पोर्टफोलिओमध्ये एआय (AI) क्षमतांचा समावेश करणे हा कंपनीचा उद्देश आहे. कंपनी आपल्या पारंपरिक सॉफ्टवेअर लायसन्सिंग मॉडेलपासून दूर जाऊन सबस्क्रिप्शन-आधारित क्लाउड सेवा आणि एआय-सक्षम एंटरप्राइझ सोल्यूशन्सकडे वाटचाल करत आहे.
यापूर्वी 2024 मध्ये SAP कंपनीत मोठी कर्मचारी कपात झाली होती. कंपनीने 10,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढले. त्यानंतर झालेल्या नवीन भरतीमुळे कर्मचाऱ्यांची एकूण संख्या पुन्हा अंदाजे 113,000 झाली आहे. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 10.3 अब्ज युरो महसूल नोंदवला, जो मागील वर्षाच्या तुलनेत 13 टक्केनी अधिक आहे. यापैकी, क्लाउड सेवांमधून 6.7 अब्ज युरोची विक्री झाली. निव्वळ नफा देखील वार्षिक तुलनेत 11 टक्केनी वाढून 2.3 अब्ज युरो झाला.
भारतासह जगभरातील 78 देशांमध्ये एसएपीची कार्यालये आहेत. जगभरात 1,13,000 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. नवी दिल्ली, गुरुग्राम, बंगळूर, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि कोलकाता यांसह भारतातील विविध शहरांमधील कार्यालयांमध्ये अंदाजे 18,000 लोक काम करतात.
जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांत पुनर्रचना योजना जाहीर केल्या आहेत. हे पुनरावलोकन अशा वेळी होत आहे, जेव्हा जगभरातील तंत्रज्ञान कंपन्या एआयच्या (AI) माध्यमातून आपली कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल आणि सेल्सफोर्स सारख्या प्रमुख अमेरिकन सॉफ्टवेअर कंपन्यांनी गेल्या वर्षभरात आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे, त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील गुंतवणूकही वाढवली आहे.