एल निनो ही स्थिती गंभीर होत जात आहे. सध्या असलेली एल निनोची स्थिती तीव्रतेच्या बाबतीत अभूतपूर्व असू शकते असा इशारा जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) आपल्या नव्या अंदाजात दिला आहे.
नोव्हेंबर 2026 ते जानेवारी 2027 या कालावधीत उष्ण कटिंबधीय, प्रशांत सागरी प्रदेशात तापमान 3.8 सेल्सिअसपर्यंत वाढू शकते असे 'डब्ल्यूएमओ'ने म्हटले आहे. गेल्या चार दशकांपासून आम्ही अभ्यासासाठी जी यंत्रणा वापरत आहोत, त्यापलीकडील ही स्थिती असल्याचे 'डब्ल्यूएमओ'च्या सरचिटणीस सेलेस्टे साउलो यांनी निवेदनात नमूद केले आहे.
'एल निनो' 2026च्या अखेरीस सर्वोच्च पातळीवर पोहोचेल, परंतु त्याचे परिणाम त्यानंतरही दीर्घकाळ जाणवत राहतील असे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. 'एल निनो' मुळे अनेक देशांत सामान्य तापमान आणि पावसाच्या पद्धती विस्कळीत होतात, असंही संशोधनात म्हटलं आहे.
प्रशांत महासागर हेच एल निनोचे मुख्य केंद्र आहे. तापमानाची ही वाढ सामान्य स्थितीपेक्षा खूप अधिक आहे. याचा परिणाम संपूर्ण जगभरात होणार आहे. एल निनोमुळं फक्त उष्णतेच्या लाटाच नाही तर जगातील विविध देशांमध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक घटना घडतील. काही ठिकाणी भयंकर दुष्काळ, उष्णता वाढेल. तर काही ठिकाणी पूरस्थितीसारख्या घटना घडतील. त्यामुळं मानवी संकट निर्माण होण्याच्या शक्यताही वर्तवण्यात येतात.
2026च्या अखेरीस एल निनो अधिक तीव्र होऊ शकते. तसंच, ही परिस्थिती 2027पर्यंत टिकू शकते. ज्यामुळं एल निनो गेल्या काही महिन्यांपासून अधिक तीव्र होत असून त्याचा जगभरातील हवामानावर परिणाम होत आहे. या परिणामांमुळे इंडोनेशियामध्ये 2015 नंतरचा सर्वात भीषण वणव्यांचा हंगाम, पूर्व पॅसिफिकमध्ये चक्रीवादळांच्या तीव्रतेत वाढ आणि भारतातील मान्सूनच्या पावसात घट दिसून येत आहे.
'एल निनो' चा वाढता प्रभाव, कमी पाऊसमान, वाढत्या उकाड्यामुळे पाण्याची वाढती मागणी आणि बाष्पीभवन आदींमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये एकूण 90 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बाष्पीभवनामुळे मोडक सागर धरणातील पाणीसाठा गेल्या दोन आठवड्यांमध्ये 18 टक्क्यांनी घसरला असून, तो 52 टक्क्यांवर आला आहे. तर, तानसा धरणातील पाणीसाठा तर 90 टक्क्यांखाली घसरल्याने मुंबईची पाणीचिंता वाढली आहे.