70 अल्पवयीन मुलींशी ऑनलाईन मैत्री करुन नको ते करायचा! भारतीय तरुणाला ब्रिटनमध्ये 30 वर्षांचा तुरुंगवास!
ब्रिटनमध्ये भारतीय तरुण बिलाल काझीने 70 अल्पवयीन मुलींना सोशल मीडियावरून फसवून ब्लॅकमेल केल्याचे उघड झाले. चेस्टर न्यायालयाने त्याला 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात मोबाईल देणं, सोशल मीडियाचा एक्सेस देणं किती कठीण जाऊ शकतं, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. एक तरुण अल्पवयीन मुलींशी ऑनलाईन मैत्री करायचा आणि त्यांच्याकडून आक्षेपार्ह फोटो मागायचा.याप्रकरणी आरोपीला 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालीय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलंय नेमकं?
ब्रिटनमध्ये अल्पवयीन मुलींचे ऑनलाइन शोषण आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी 27 वर्षीय बिलाल काझीला 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 13 नोव्हेंबर 2026 रोजी चेस्टर क्राउन कोर्टात ही शिक्षा सुनावण्यात आली. काझीने सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुलींशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ मिळवून त्यांचा गैरवापर केल्याचे तपासात समोर आले. त्याला 30 वर्षांच्या शिक्षेबरोबरच अतिरिक्त आठ वर्षांचा विस्तारित परवाना कालावधीही लागू करण्यात आला आहे.
स्वतःला 14 वर्षांचा मुलगा सांगून मुलींशी मैत्री
काझी सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्मवर स्वतःची ओळख ‘रीस’ अशी करून देत असे. तो स्वतःला ब्रिटिश किशोरवयीन मुलगा असल्याचे भासवत असे. यासाठी त्याने एका अज्ञात मुलाचे फोटो वापरले होते. स्नॅपचॅट, रॉब्लॉक्स, विंक यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून तो मुलींशी संवाद साधायचा. मुलींचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना आपल्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा भास निर्माण केला जात असे. त्यानंतर त्यांच्याकडून खासगी फोटो आणि व्हिडीओ मागण्यास सुरुवात होत असे. या प्रकरणातील पीडित मुलींचे वय 10 ते 17 वर्षांदरम्यान होते.
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल
मुलींनी आणखी फोटो किंवा व्हिडीओ पाठवण्यास नकार दिल्यानंतर काझी त्यांना आधी पाठवलेले फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देत असे. काही मुली भीतीपोटी त्याच्या मागण्या मान्य करत राहिल्या. काही प्रकरणांमध्ये मुलींच्या सोशल मीडिया खात्यांमध्ये प्रवेश करून त्यांची खासगी सामग्री इतरांपर्यंत पोहोचवण्यात आली. एका पीडित मुलीच्या आईला मुलीच्या फोनमधील संशयास्पद संदेश आढळल्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.
180 संभाव्य पीडितांची माहिती
चेशायर पोलिसांच्या ऑनलाइन बाल लैंगिक शोषण तपास पथकाने या प्रकरणाचा तपास केला. काझीच्या मोबाईलमधील माहिती आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला 180 संभाव्य पीडितांचा शोध घेतला. त्यापैकी ब्रिटनमधील 28 पोलीस क्षेत्रांमध्ये 70 मुलींची ओळख पटवण्यात आली. काझीविरोधात चेशायर पोलिसांच्या तपासात 39 गुन्ह्यांचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी 37 आरोप त्याने मान्य केले; दोन आरोप न्यायालयीन नोंदीवर ठेवण्यात आले. पोलिसांनी वेस्ट मिडलँड्समधील आणखी आठ गुन्ह्यांचाही तपास केला.