AI चा फुगा फुटला? अमेरिकेत हाहाकार, गुंतवणुकदारांचे 560 कोटी बुडाले
एआयचा फुगा फुटला? अशी शक्यता निर्माण होणारी परिस्थिती अमेरिकेन शेअर बाजारात निर्माण झाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे.
अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठी घसरण एकाच आठवड्यात अमेरिकन बाजारात झाली आहे. ही घसरण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कंपन्यांच्या व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या संभाव्यतेबद्दल वाढत्या चिंतेमुळे झाली असल्याचा दावा केला आहे.
स्टॉक मार्केटमधील घसरणीमुळे, गेल्या आठवड्यात अमेरिकन शेअर बाजाराचे एकूण बाजारमूल्य अंदाजे 6 ट्रिलियन डॉलर्सने घसरले आहे. जे भारतीय चलनानुसार 560 लाख कोटी रुपये इतके आहे. म्हणजे एका दिवसांतच 1 ट्रिलियन डॉलर्स इतके नुकसान सोसले. एस अँड पी 500 सलग सात ट्रेडिंग सत्रांपासून घसरत आहे, ही 2020 नंतरची सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.
शुक्रवारी मार्केटमध्ये एआय कंपनी अँथ्रोपिकच्या आयपीओबद्दल आशा निर्माण झाली होती. तेव्हापासूनच ही घसरण अधिक तीव्र झाली आहे. परंतु आयपीओ लिस्टिंग होताच आणखी मोठी घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांनी एआय संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा कमावला आहे, ज्यामुळे नॅसडॅक कंपोझिटला 2026 मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा तोटा झाला. तसेच गेल्या ६ वर्षांतील निर्देशांकासाठी हा सर्वात वाईट आठवडा होता. तर एस अँड पी 500 आणि डाऊ जोन्स त्यांच्या विक्रमी पातळीवरून 10 टक्क्यांनी घसरले आहेत. मार्केट 10 टक्क्यांनी घसरल्यानंतर करेक्शनची परिस्थिती मानली जात आहे.
नॅस्डॅक कंपोझिट 5.28 टक्क्यांनी घसरून 22,617.73 वर बंद झाला, जी वर्षाच्या सुरुवातीपासून 2.7 टक्क्यांची घसरण आहे. एस अँड पी 500 3.7 टक्क्यांनी घसरून 6,910.39 वर बंद झाला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 949.73 अंकांनी, म्हणजेच 1.93 टक्क्यांनी घसरून 48,147.33 वर आला. नॅस्डॅक 100 मध्ये 5.6 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली, जो व्यवहारादरम्यान त्याच्या अलीकडील उच्चांकावरून 20 टक्क्यांनी खाली आला.
मार्केटमध्ये अचानक इतकी घसरण का?
मार्केटमध्ये आलेली ही घसरण AI मुळं झाल्याचं मानण्यात येतंय. एआय (AI) बाबत गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन बदलत आहे. कंपन्यांचा एआयवरील प्रचंड खर्च, डेटा सेंटर बांधकामाची गती आणि या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठीच्या निधीत झालेली घट, यामुळे तंत्रज्ञान कंपन्यांच्या कमाईच्या अपेक्षांवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे.
दुसरीकडे, गुंतवणूकदार आता सुरक्षित मालमत्तेकडे वळत आहेत, ज्यामुळे एआय आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. गुंतवणूकदार बॉण्ड मार्केट आणि भारतासारख्या बाजारपेठांमध्ये आपली गुंतवणूक वाढवत आहेत.