गॉडझिला हे नाव ऐकताच डोळ्यासमोर येतो तो हॉलिवूड चित्रपटातील भयंकर डायनासॉर... जो एका क्षणात हसत्या खेळत्या शहरात विध्वंस माजवतो. मात्र सध्या गॉडझिलाचे नाव हॉलिवूड चित्रपटांमुळं नाही तर हवामान बदलामुळं चर्चेत आले आहे. पुढील काळात येणाऱ्या महाभयानक संकटाबाबत आहेत. प्रशांत महासागरात एक खतरनाक हवामान प्रणाली निर्माण होतेय. ज्याचा परिणाम अनेक देशांवर होणार असून उष्णतेचे सगळे रेकॉर्ड मोडणार आहेत. नासापासून ते संयुक्त राष्ट्रपर्यंत सगळ्या संस्थांनी एल निनोवरुन सावधानतेचा इशारा दिला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या मध्यापर्यंत प्रशांत महासागरात शक्तिशाली एल निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता 80 ते 90 टक्के इतकी आहे. जर असं झाले तर जगभरात त्याचे भयानक परिणाम दिसून येतील.
सोप्या भाषेत म्हणायचे झाले तर, एल निनो प्रशांत महासागरात होणारी एक हवामान बदलाची घटना आहे. साधारण दिवसांत वेगवान वारे समुद्राचे गरम पाणी आशिया आणि ऑस्ट्रेलियाकडे ढकलतात. मात्र एल निनोची स्थिती असताना हे वारे कमकुवत होतात. त्याचाच परिणाम म्हणजे, गरम पाणी पुन्हा मागे हटून दक्षिण अमेरिकेकडे सरकते. या बदलामुळं संपूर्ण जगाच्या हवामानावर परिणाम होतो.
सगळ्यात पहिले पेरूदेशातील मच्छिमारांनी पाण्याच्या या बदलाचे निरीक्षण केले होते. तेव्हा नाताळ सुरू होता. त्यामुळं त्याचे नाव एल निनो असं देण्यात आले. हा एक स्पॅनिश भाषेतील शब्द आहे, ज्याचा अर्थ 'छोटा मुलगा' किंवा 'बाल येशू' (The Christ Child) असा होतो.
यंदाच्या एल निनोच्या गॉडजिला नाव देण्यात आले आहे. एल निनोसोबत हे नाव 2015पासून जोडले गेले आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमधील शास्त्रज्ञ बिल पॅटझर्ट यांनी समुद्रातील अनियंत्रित उष्णता पाहिल्यानंतर 'गॉडझिला एल निनो' ही संज्ञा सर्वप्रथम वापरली. केवळ माहितीच्या आधारे शास्त्रज्ञांना धोक्याची तीव्रता मोजता येत नव्हती, म्हणून ते किती विनाशकारी असू शकते हे लोकांना समजण्यास मदत व्हावी यासाठी त्यांनी हा शब्द वापरला.
इतिहासात आत्तापर्यंत 1982-83, 1997-98 आणि 2015-16 मध्ये गॉडझिला एल निनोची स्थिती निर्माण झाली होती. यामुळं जगभरात भयंकर पुरस्थिती, दुष्काळ आणि जंगलात वणवा पेटल्याच्या घटना सुरू झाल्या होत्या.
2026 मध्ये येऊ घातलेल्या गॉडझिला एल निनोमुळे भारताला धोका निर्माण झाला आहे, कारण नवीन अंदाजानुसार, हा एल निनो मागील सर्व विक्रम मोडून काढू शकतो. यामुळे भारताला गंभीर धोका निर्माण झाला आहे, कारण जेव्हा जेव्हा पॅसिफिक महासागरात गॉडझिला जागा होतो, तेव्हा भारतातील मान्सून कमकुवत होतो आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते.