सार्वजनिक ठिकाणी मार्यादेचं उल्लंघन करत विचित्र चाळे करणाऱ्यांना चोप दिल्याची अनेक उदाहरणं तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकली असतील, त्याबद्दल वाचलं असेल. मात्र बागेत एकटं बसून रडत असल्यास तुम्हाला दंड झाला तर? तुम्ही म्हणाल की माझं मी एकट्यात रडत असताना दंड करायचं कारण काय? असा प्रश्न जर्मनीमधील एका महिलेला पडला जेव्हा तिला खरोखरच एकटं बसून रडताना स्थानिक प्रशासनाने तब्बल 2350 रुपयांचा दंड ठोठावला आहे. नेमका हा प्रकार काय आहे जाणून घेऊयात...
कुठे घडला हा प्रकार?
तर हा सारा प्रकार घडलाय, जर्मनीतील गेल्सेनकिर्चेन शहरामध्ये! येथे लहान मुलांना खेळण्यासाठी बांधण्यात आलेल्या छोट्याश्या बागेत बाकावर एकटीच बसून रडणाऱ्या 31 वर्षीय तरुणीला स्थानिक प्रशासनाने 25 युरो (सुमारे ₹2350 इतका) दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केमिस्टीची विद्यार्थी असलेली हाना (Hana) नावाची तरुणी अभ्यासाचा आणि आर्थिक अडचणींचा ताण आल्यामुळे मन हलके करण्यासाठी 'ग्लुकॉफपार्क'येथे फिरायला गेली होती. चालताना तिला फार विचार करत असल्याने भरुन आलं आणि अचानक रडू कोसळलं. ती बागेतील लहान मुलांच्या खेळण्याच्या भागातील एका बाकावर बसून फोनवर आपल्या आत्याशी बोलत होती. ती तिचं मन मोकळं करत होती. तिला काय वाटतंय, एवढं भरुन आल्यासारखं का झालं याबद्दल सांगत होती.
तीन अधिकारी जवळ आले अन्...
त्याचवेळी हाना रडत असताना महापालिकेच्या सार्वजनिक सुव्यवस्था विभागाचे तीन अधिकारी तिच्याजवळ आले. जवळच खेळणारी दोन मुले तुमची आहेत का? अशी विचारणा त्यांनी हानाकडे केली. तिने नाही असे उत्तर दिल्यावर, लहान मुलांसाठी राखीव असलेल्या मैदानात मुलं सोबत असल्याशिवाय बसणे नियमांचे उल्लंघन असल्याचे हानाला सांगण्यात आलं. अधिकाऱ्यांनी यानंतर हानाचे आयकार्ड तपासले आणि 25 युरो दंडाची पावती फाडली. लहान मूल सोबत नसताना बाल उद्यानामध्ये प्रवेश केल्याबद्दल हा दंड आकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
नियम काय सांगतात?
गेल्सेनकिर्चेन येथील नियमांनुसार, लहान मुलांचे खेळाचे मैदान केवळ 14 वर्षे आणि त्याखालील मुलांसाठी राखीव असते. या ठिकाणी त्यांच्यासोबत केवळ त्यांचे पालक किंवा केअर टेकर्सच तिथे थांबू शकतात. स्थानिक प्रशासनाने या कारवाईचे समर्थन करत हा दंड 'सौम्य आणि योग्य' असल्याचे म्हटले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला एका तणावग्रस्त आणि रडणाऱ्या महिलेसंदर्भातील या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांनी माणुसकी न दाखवता कठोर नियम लावल्याबद्दल सोशल मीडियावर आणि स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हानाने हा दंड भरला आहे.
बागेत एकटी बसू रडणंही गुन्हा आहे की काय? असा सवाल अनेकजण विचारताना दिसत आहेत.