इराण आणि इस्रायल अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक विमान वाहतुकीचे चित्र आता पूर्णपणे बदलले आहे. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक मध्य पूर्वेकडे वळल्याने जगातील सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीत दुबईची पिछाडीवर आले आहे. विशेष म्हणजे दुबईची जागा घेणाऱ्या विमानतळाचं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अनेकांनी हे नाव यापूर्वी कधी ऐकलंही नसेल. सर्वाधिक व्यस्त विमानतळांच्या यादीमध्ये पहिलं स्थान दक्षिण कोरियाच्या इंचिओन आंतरराष्ट्रीय विमानतळाने पटकावलं आहे. 2026 च्या पहिल्या सहा महिन्यात आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीची आकडेवारी लक्षात घेत हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ ठरवण्यात आलं आहे.
किती प्रवाशांनी या विमानतळावरुन केला प्रवास?
इंचिओन विमानतळाने 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांत 3 कोटी 84 लाख आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सेवा दिली. 2001 मध्ये विमानतळ सुरू झाल्यापासून हे विमानतळ प्रथमच जगातील सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून आकडेवारीच्या आधारावर समोर पहिल्या स्थानावर आलं आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे युरोपकडे जाणाऱ्या प्रवाशांनी आणि विमानांनी इंचिओन विमानतळाचा पर्याय निवडला आहे. तसेच चीन आणि जपानमधून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. गेल्या 12 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय वाहतुकीत दुबई प्रथम क्रमांकावर होते. हवाईबंदीमुळे यूएईच्या प्रवाशांची संख्या फेब्रुवारीमधील 74 लाखांवरुन मार्चमध्ये 25 लाखांपर्यंत घसरली.
अव्वल तीन विमानतळं कोणती?
जगातील सर्वात व्यस्त विमानतळांचा विचार केला तर प्रवासी संख्येनुसार यावर्षी पहिल्या सहा महिन्यांमध्ये लंडन हिथ्रो दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 3 कोटी 77 लाख 90 हजार प्रवाशांनी लंडन हिथ्रो विमानतळावरुन प्रवास केला. त्यापाठोपाठ तिसऱ्या स्थानावर सिंगापूरचे चांगी विमानतळ असून, याच कालावधीत त्याच्या टर्मिनलमधून 3 कोटी 40 लाख ५३ हजार आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी प्रवास केला आहे.
सर्व व्यस्त विमानतळावरुन किती ठिकाणी जातात विमानं?
लंडनचे हिथ्रो विमानतळ 2024 मध्ये पाचव्या आणि 2025 मध्ये सातव्या क्रमांकावर होते, तर इंचिओन अनुक्रमे 12 व्या आणि 13 व्या क्रमांकावर होते. युरोपला जाताना पूर्वी दुबईमार्गे प्रवास करणारे काही प्रवासी आता इंचिओनमार्गे प्रवास करत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत ट्रान्सफर प्रवाशांमध्ये 18 टक्यांनी वाढ झाली आहे. पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे विमानतळाला अधिक वाहतूक भार हाताळणेही शक्य झाले आहे. इंचिओन विमानतळ 158 आंतरराष्ट्रीय ठिकाणांना सेवा देते. त्या तुलनेत, हाँगकाँगचे आंतरराष्ट्रीय विमानतळ 139, शांघायचे पुडोंग 92, तर टोकियोचे नारिता 86 ठिकाणांना सेवा देते.
भविष्यातील योजना काय?
इंचिओन विमानतळ महामंडळाचे कार्यवाहक अध्यक्ष किम बेओम-हो यांनी विमानतळाला मिळालेल्या या सन्मानासंदर्भात बोलताना, "इंचिओनला जगातील पहिल्या क्रमांकाचे विमानतळ बनवण्यासाठी सरकारचा पाठिंबा, जनतेचे प्रोत्साहन आणि विमानतळावर तैनात प्रत्येकाच्या कठोर परिश्रम घेणाऱ्यांचे आम्ही आभारी आहोत," असं म्हणत सर्वांचे आभार मानले आहेत. प्रवाशांच्या सोयीवर लक्ष केंद्रित करून स्पर्धात्मकता वाढवण्याची महामंडळाची योजना आहे, असंही किम बेओम-हो यांनी भविष्यातील वाटचालीबद्दल बोलताना स्पष्ट केलं.