अॅपलच्या महागड्या आयफोनची क्रेझ कमी होत आहे का? आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स या नव्या प्रीमियम स्मार्टफोनच्या मागणीत अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त समोर आले आहे. यानंतर अॅपलने ऑक्टोबर महिन्यासाठी या फोनच्या सुट्या भागांच्या उत्पादनाच्या मागणीत 15 ते 20 टक्क्यांपर्यंत कपात केल्याचे सांगितले जात आहे. वाढलेली किंमत, मेमरी चिपचा वाढता खर्च आणि फोनच्या वितरणातील बदल ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
‘निक्केई एशिया’च्या वृत्तानुसार, अॅपलने आपल्या पुरवठादारांना iPhone 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स साठी तयार होणाऱ्या सुट्या भागांच्या मागणीत कपात करण्यास सांगितले आहे. ऑक्टोबर महिन्यासाठी सुरुवातीच्या नियोजनाच्या तुलनेत या भागांच्या मागणीत 15 ते 20 टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली आहे. ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे कंपनीने उत्पादन आणि पुरवठ्याचे नियोजन अधिक सावधपणे करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.
या वर्षी अॅपलने आयफोन 18 प्रो मॅक्स प्रो मालिकेच्या सुरुवातीच्या किमती मागील मॉडेलच्या तुलनेत 100 डॉलरने वाढवल्याचे वृत्त आहे. अमेरिकेत आयफोन 18 प्रोची सुरुवातीची किंमत 1999 डॉलर, तर आयफोन 18 प्रो मॅक्सची किंमत 1299 डॉलर आहे.प्रीमियम स्मार्टफोनसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत असल्याने काही जण खरेदीचा निर्णय पुढे ढकलत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर माहिती साठवणाऱ्या केंद्रांची उभारणी सुरू आहे. या केंद्रांसाठी प्रगत चिप आणि मेमरीची मोठी मागणी निर्माण झाली आहे. परिणामी, या घटकांच्या पुरवठ्यावर ताण येत असून त्यांचा खर्चही वाढत आहे.स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या मेमरी चिपच्या किमती वाढल्याचा परिणाम अॅपलसारख्या कंपन्यांवरही होत आहे. उत्पादन खर्च वाढल्यास कंपन्यांना फोनच्या किमती वाढवाव्या लागू शकतात किंवा नफ्यावर परिणाम होऊ शकतो. अॅपलने यापूर्वी जूनमध्ये आयपॅड आणि मॅकबुकच्या किमतीही वाढवल्या आहेत.
यंदा अॅपलने सप्टेंबरमध्ये आपल्या महागड्या आयफोन मॉडेल्सचे अनावरण केले. मात्र, नियमित आयफोन 18 आणि आयफोन Air ही मॉडेल्स 2027 मध्ये सादर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहकांसाठी कमी किमतीचे नवीन पर्याय उपलब्ध नसल्याचा परिणाम विक्रीवर झाला असू शकतो. तसेच, 30 पेक्षा अधिक बाजारपेठांमध्ये आयफोनच्या वितरणासाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी झाल्याचेही वृत्त आहे. यावरून सुरुवातीची मागणी काहीशी मंदावली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उत्पादनाच्या सुट्या भागांच्या मागणीत कपात झाल्याचा अर्थ अॅपलला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे नाही. कंपनीच्या विक्रीचे प्रमाण, प्रत्येक फोनमागील नफा, उत्पादन खर्च आणि ग्राहकांचा प्रतिसाद यावर आर्थिक परिणाम अवलंबून असेल. असे असले तरी अॅपलचा फोल्डेबल फोन आयफोन ड्युओ देखील चर्चेत आहे. त्याची अमेरिकेतील सुरुवातीची किंमत 1999 डॉलर असून तो 23 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या महागड्या फोनला ग्राहक कसा प्रतिसाद देतात, याकडेही बाजाराचे लक्ष असेल.