आजकाल दोन व्यक्तींमधील नाते हे कच्च्या धाग्यासारखे झाले आहे, हे सांगण्याचे कारण म्हणजेच नात्यामध्ये येणारा दुरावा हा आजकाल फार लवकर येत आहे. एवढेच नाही तर नात्यांमधील संघर्ष देखील कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे नात्यातील अंतर, दुरावा वाढत जातो. पूर्वी पत्नी आणि पतीमध्ये लहानमोठी भांडण होत होती, तर कुटुंबामध्ये कधी कुजबुज होत असे. पण आता नात्यामध्ये कोणतेही संभाषण न होता विचित्र शांतता पाहायला मिळते. त्यामुळे दोघांच्या नात्यामध्ये आणखी दुरावा वाढण्याचे कारण आहे, त्याला आताच्या भाषेमध्ये यालाच सायलेंट क्विटिंग असे म्हंटले जाते.
'सायलेंट क्विटिंग' या शब्दाचा उगम कॅार्पेरेट कार्यालये आणि नोकऱ्यांमध्ये झाला, जिथे कर्मचारी नोकरी न सोडता केवळ पगाराएवढेच काम करतात आणि कंपनीशी असलेले मानसिक संबंध तोडून टाकतात. पण आता ही धोकादायक प्रवृत्ती आपल्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनातही शिरली आहे. याचा अर्थ नोकरी सोडणे असा नाही, तर आपल्या जोडीदारापासून आणि नात्यापासून शांतपणे मानसिक आणि भावनिकरित्या दूर जाणे असा आहे. केंब्रिज डिक्शनरीनुसार, "क्वाइट क्विटिंग" (शांतपणे नोकरी सोडणे) ही एक अशी अवस्था आहे, ज्यात कर्मचारी मानसिक आणि भावनिकरित्या आपल्या कामापासून अलिप्त होतो आणि स्वतःला केवळ नेमून दिलेल्या कामांपुरतेच मर्यादित ठेवतो. "क्वाइट क्विटिंग"मध्ये काहीही नवीन नाही. हे केवळ एका जुन्या संकल्पनेला किंवा प्रथेला दिलेले एक नवीन नाव आहे.
आजच्या काळात, हे मूक अंतर पती-पत्नीच्या सुखी नात्याला वाळवीप्रमाणे पोखरून काढत आहे. असे का घडत आहे आणि ते कसे टाळता येईल, यावर आज आपण मोकळेपणाने बोलूया. आता प्रश्न असा निर्माण होतो की, अचानक असे काय घडले आहे ज्यामुळे लोक आपल्या जोडीदारांपासून दुरावले आहेत? याची अनेक कारणे आहेत. पूर्वी जोडपी दिवसभरातील घडामोडी एकमेकांना सांगत तासन्तास बोलत असत. आता दोघेही आपापल्या मोबाईल फोनमध्ये मग्न असतात. जेव्हा जोडीदार मोकळेपणाने बोलणे थांबवतात आणि आपल्या तक्रारी दाबून ठेवतात, तेव्हा ही शांतता निर्माण होते.
नातेसंबंध तज्ज्ञांच्या मते, जोडीदार म्हणून भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या दुरावा निर्माण झाला तरी, ते जोडपे घरातील कामे आणि मुलांची काळजी यांसारख्या दैनंदिन जबाबदाऱ्या वाटून घेत राहतात. हा शब्द सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे, ज्यात वापरकर्ते व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत आहेत, ज्यात ते विवाहित असूनही भावनिकदृष्ट्या एकाकी वाटत असल्याचे सांगत आहेत. तज्ज्ञांच्या मते, परस्पर मतभेद किंवा संघर्षाचा पूर्ण अभाव हे देखील एक धोक्याचे चिन्ह असू शकते.