उंची ही केवळ शरीराची रचना ठरवणारी बाब नसून जोडीदार निवडताना काही लोकांच्या पसंतीवरही तिचा परिणाम होऊ शकतो. विविध वैज्ञानिक अभ्यासांमध्ये पुरुषांना सरासरी स्वतःपेक्षा कमी उंचीच्या महिला पसंत करण्याची प्रवृत्ती दिसून आली आहे. मात्र यामागे नेमकं कारण काय? कमी उंची म्हणजे अधिक तरुण दिसणं, प्रजनन क्षमतेशी संबंधित संकेत की सामाजिक-सांस्कृतिक प्रभाव? याबाबत संशोधनातून समोर आलेल्या काही महत्त्वाच्या शक्यता जाणून घेऊया.
जोडीदाराच्या उंचीबाबत करण्यात आलेल्या अनेक अभ्यासांमध्ये मेल टॉलर नॉर्म म्हणजे पुरुष हा महिला जोडीदारापेक्षा उंच असण्याची प्रवृत्ती आढळली आहे. चार देशांतील 500 हून अधिक सहभागींच्या अभ्यासातही पुरुषांनी सरासरी स्वतःपेक्षा सुमारे 2.5 सेंटीमीटर कमी उंचीच्या महिलांना पसंती दिल्याचे दिसून आले. मात्र संशोधकांनी हेही स्पष्ट केले आहे की अशा पसंती प्रत्यक्ष नातेसंबंधांमध्ये नेहमी त्याच प्रमाणात दिसतीलच असे नाही.
काही उत्क्रांतीवादी सिद्धांतांनुसार जोडीदार निवडताना वयाशी संबंधित शारीरिक संकेत महत्त्वाचे ठरू शकतात. एका अभ्यासात महिलांची उंची आणि लैंगिक परिपक्वतेचे वय यांच्यात संबंध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महिला उंचीला प्रजननक्षमतेचा थेट किंवा अचूक संकेत मानणे योग्य नसले तरी, उत्क्रांतीवादी दृष्टिकोनातून शरीराची वाढ आणि लैंगिक परिपक्वता यांचा अभ्यास केला गेला आहे.
‘कमी उंचीची महिला म्हणजे अधिक प्रजननक्षम’ असा सरळ वैज्ञानिक निष्कर्ष संशोधनातून निघत नाही. ब्रिटनमधील महिलांच्या डेटावर झालेल्या एका अभ्यासात उंची आणि रिप्रोॉडक्टिव्ह सक्सेस यांच्यात कमकुवत पण सांख्यिकीय संबंध दिसला. या संबंधाचा आकार यू-शेपड होता आणि अत्यंत कमी किंवा अत्यंत जास्त उंचीच्या महिलांमध्ये आरोग्याशी संबंधित कारणांमुळे रिप्रोक्टिव्ह सक्सेस कमी असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले.
पुरुषांना कमी उंचीच्या महिला आवडण्यामागे फक्त जैविक किंवा उत्क्रांतीवादी कारणे आहेत, असे मानणे योग्य ठरणार नाही. सामाजिक अपेक्षा आणि जेंडर नॉर्म्स यांचाही प्रभाव असू शकतो. काही संशोधनानुसार पुरुषापेक्षा महिला कमी उंचीची असावी, ही सामाजिक कल्पना अनेक संस्कृतींमध्ये प्रचलित आहे. त्यामुळे व्यक्तीची पसंती ही जैविक घटकांसोबत सामाजिक वातावरणातूनही प्रभावित होऊ शकते.
वैज्ञानिक अभ्यासांमध्ये उंचीबाबत काही ठराविक प्रवृत्ती दिसत असल्या तरी प्रत्येक व्यक्तीची पसंती सारखी नसते. एका मोठ्या अभ्यासात उंचीबाबतच्या पसंती प्रत्यक्ष जोडप्यांमध्ये काही प्रमाणात दिसल्या, पण त्यांचा प्रभाव मर्यादित असल्याचे आढळले. म्हणजेच जोडीदार निवडताना उंची हा अनेक घटकांपैकी फक्त एक घटक आहे. व्यक्तिमत्त्व, आकर्षण, मूल्ये, भावनिक जुळवून घेणे आणि सामाजिक परिस्थिती यांसारखे अनेक घटक नातेसंबंधात महत्त्वाचे ठरतात.