हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरातील कोणत्या भागात जाणवतात वेदना?, या 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. काय आहेत लक्षणे जाणून घेऊयात.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात हार्ट अॅटेकचे प्रमाण वाढत आहे. हार्ट अॅटेकचा धोका कमी करता येतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर आपल्याला संकेत देत असते. शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना होतात. याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊयात.
छातीत वेदना किंवा दबाव जाणवणे
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी छातीत वेदना होतात. तसंच, छातीवर दबाव आल्यासारखे जाणवते. या लक्षणाबद्दल सांगताना डॉक्टरांनी सांगितले की, छातीवर दबाव जाणवतो तेव्हा असं वाटतं की एखादी जड वस्तू ठेवलीये. ही वेदना काही मिनिट भरापर्यंत जाणवू शकते किंवा कळ मध्ये मध्ये येऊ शकते.
डाव्या हातात वेदना
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी, काही लोकांना त्यांच्या डाव्या हातात किंवा दोन्ही हातांमध्ये वेदना जाणवू शकतात. डॉक्टरांच्या मते, कधीकधी ही वेदना खांद्यापासून सुरू होऊन हात आणि बोटांपर्यंत पसरते. काही लोकांमध्ये ही वेदना दोन्ही हातांमध्ये जाणवू शकते.
मान, जबडा आणि घशात वेदना
हृदयविकाराच्या झटक्याची वेदना केवळ छातीपुरती मर्यादित नसते. अनेक रुग्णांना मान, जबडा किंवा घशात असामान्य वेदना किंवा दाब जाणवतो. हे लक्षण विशेषतः महिलांमध्ये सामान्यपणे आढळते.
पाठदुखीसारखे जाणवते
पाठीच्या वरच्या भागात, विशेषतः खांद्यांच्या मध्ये होणारी वेदना हे हृदयाच्या समस्येचे लक्षण देखील असू शकते. बरेच लोक याला सामान्य स्नायूदुखी समजून दुर्लक्ष करतात, परंतु हे हृदयविकाराच्या झटक्याचे प्राथमिक इशारा असू शकतो.
पोटाच्या वरच्या भागात वेदना
काही लोकांना हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी पोटाच्या वरच्या भागात वेदना, जळजळ, जडपणा किंवा अपचनाचा अनुभव येऊ शकतो. यामुळेच लोक अनेकदा याला गॅस किंवा ॲसिडिटी समजण्याची चूक करतात.