SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बाळंतपणानंतरही आईचे मानसिक आरोग्य जपा! ही लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरकडे धाव घ्या!

गर्भावस्थेपासून प्रसूतीनंतरपर्यंत डॉक्टरांशी नियमित संवाद साधल्यास मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या वेळीच ओळखता येतात आणि महिलेला योग्य वेळी आवश्यक ती मदत मिळू शकते.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 15, 2026, 02:35 PM IST | Updated: Oct 15, 2026, 02:37 PM IST
Image Credit: postpartum depression
Join

बाळाच्या जन्माची तयारी करताना गर्भवती महिलेच्या तपासण्या, औषधे, आहार आणि बाळाच्या वाढीची नियमित काळजी घेतली जाते. मात्र, या सगळ्यादरम्यान तिच्या मानसिक अवस्थेकडे अनेकदा दुर्लक्षित केले जाते. बाळाच्या आरोग्याची चिंता, प्रसूतीची भीती, झोपेचा अभाव, शारीरिक त्रास आणि प्रसूतीनंतरची वाढलेली जबाबदारी यामुळे महिलेला मानसिक ताण जाणवू शकतो. सतत चिंता वाटणे, उदास राहणे किंवा चिडचिड होणे हे केवळ गर्भावस्थेचा किंवा मातृत्वाचा भाग मानून त्याकडे दुर्लक्ष करू नका असे डॉ. मधुलिका सिंह, वरिष्ठ स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गर्भावस्था आणि मातृत्वामुळे महिलांच्या शरीरात तसेच भावनांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात. त्यामुळे सतत चिंता वाटणे, उदास राहणे, कारण नसताना रडू येणे, चिडचिड होणे, झोप न लागणे किंवा आई झाल्यानंतरच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात अडचण येणे याकडे याकडे मातृत्वाचा एक टप्पा समजून दुर्लक्ष करू नये. अशा समस्या वेळीच ओळखून योग्य मदत घेतल्यास महिलांना या काळाशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेता येते.

गर्भावस्थेतील चिंता : बाळाची वाढ योग्य होत आहे का, गर्भावस्थेत काही गुंतागुंत होईल का, प्रसूती कशी होईल किंवा आई म्हणून जबाबदारी पार पाडता येईल का, अशा अनेक विचारांमुळे काही महिलांना सतत चिंता वाटू शकते.

रक्ताची कमतरता आणि थकवा : गर्भावस्थेत हिमोग्लोबिन कमी असल्यास थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे आणि ऊर्जा कमी होणे यासारख्या समस्या जाणवू शकतात. याचा भावनिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

गर्भावस्थेतील गुंतागुंत : उच्च रक्तदाब, प्री-एक्लॅम्पसिया किंवा गर्भावस्थेतील मधुमेह यांसारख्या समस्यांमुळे शारीरिक त्रासासोबत मानसिक ताणही वाढू शकतो.

प्रसूतीची भीती : प्रसूती वेदना, प्रसूतीदरम्यान होणाऱ्या गुंतागुंती किंवा बाळाच्या आरोग्याची चिंता यामुळे काही महिलांना प्रसूतीची तीव्र भीती वाटू शकते. अशावेळी डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे.

झोपेचा अभाव : गर्भावस्थेतील शारीरिक अस्वस्थता आणि वारंवार लघवीला जाणे यामुळे झोप कमी होऊ शकते. प्रसूतीनंतर बाळाला वारंवार दूध पाजणे आणि रात्री उठून बाळाची काळजी घेणे यामुळे झोपेवर परिणाम होतो. दीर्घकाळ झोप पूर्ण न झाल्यास मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

प्रसूतीनंतरचे नैराश्य : प्रसूतीनंतर सतत उदास वाटणे, वारंवार रडू येणे, कोणत्याही गोष्टीत रस न वाटणे, निराशा किंवा अतिशय चिडचिड होणे आणि परिस्थिती हाताळणे कठीण वाटणे ही लक्षणे केवळ थकव्यामुळे आहेत असे समजू नये.

प्रसूतीनंतरची चिंता : बाळाच्या आरोग्याबाबत सतत काळजी वाटणे किंवा काहीतरी वाईट घडेल अशी भीती वाटत राहणे अशी समस्या काही महिलांमध्ये दिसून येते. ही चिंता अतिशय वाढली किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ लागला तर तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे.

स्तनपान आणि प्रसूतीनंतरच्या आरोग्याबाबत चिंता : स्तनपान करताना होणारा त्रास, बाळाला दूध पाजण्यात येणाऱ्या अडचणी, शरीरातील बदल आणि प्रसूतीनंतर पूर्ववत होण्यासाठी लागणारा वेळ यामुळेही महिलांमध्ये ताण वाढू शकतो.

ही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

सतत उदास वाटणे, खूप चिंता वाटणे, कारण नसताना सारखे रडू येणे, अतिशय चिडचिड होणे, रोजच्या कामांमध्ये फारसा रस न वाटणे, बाळ झोपलेले असतानाही झोप न लागणे, निराश किंवा हताश वाटणे तसेच स्वतःची किंवा बाळाची काळजी घेणे आव्हानात्मक वाटणे अशी लक्षणे जाणवल्यास महिलांनी स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा.

गर्भावस्थेतील नियमित तपासण्यांमध्ये महिलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच आवश्यक आहे. विशेषतः गर्भावस्थेत काही गुंतागुंत असल्यास, ताण अधिक असल्यास किंवा प्रसूतीनंतर भावनिक अडचणी जाणवत असल्यास डॉक्टरांनी महिलेच्या मनःस्थिती, झोप, ताण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेबाबत विचारणे गरजेचे आहे.

या काळात कुटुंबाची साथ देखील तितकीच महत्त्वाची ठरते. पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी बाळाची तसेच घरातील कामांची जबाबदारी वाटून घेणे, नव मातेला पुरेशी विश्रांती मिळेल याची काळजी घेणे आणि तिच्या भावनांकडे दुर्लक्ष करता तिला समजून घेणे गरजेचे आहे. पौष्टिक आहार, पुरेशी विश्रांती, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य शारीरिक हालचाल आणि मन शांत ठेवण्यासाठी आवश्यक उपाय यामुळे नव मातेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते. मानसिक त्रास जाणवत असल्यास केवळ स्वतःहून त्यावर मात करण्याचा प्रयत्न न करता तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES