पांढरे की सैंधव, निरोगी आरोग्यासाठी कोणते मीठ चांगले? तज्ज्ञ काय सांगतात, वाचाच
निरोगी आरोग्यासाठी आपल्या जेवणात नेहमी कोणते मीठ असावे, तज्ज्ञ काय सांगतात. वाचा सविस्तर
बदललेली जीवनशैली आणि आरोग्याच्या वाढत्या तक्रारी त्यामुळं आता भारतीय नागरिक आरोग्याबाबत अधिक जागरूर झाले आहेत. आता जेवणात वापरण्यात आलेले घटक याबाबतही ते अधिक सजग असतात. आजकाल पांढऱ्या आयोडिनयुक्त मिठाऐवजी सैंधव, पिंक सॉल्ट आणि रॉक सॉल्ट वापरण्यात येतात. मात्र मिठाच्या रंगाऐवजी त्याच्यात किती टक्के सोडियमचे प्रमाण व आयोडिन आहे हे पाहणं महत्त्वाच असल्याचे तज्ज्ञ म्हणतात.
आयोडिन हे थायरॉइड संप्रेरकांच्या निर्मितीसाठी आवश्यक खनिज आहे. शरीराची वाढ, चयापचय आणि बालकांच्या मेंदूच्या विकासासाठी ते महत्त्वाचे ठरते. आयोडिनच्या कमतरतेमुळे गलगंडासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आहारात आयोडिनयुक्त मिठाचा वापर उपयुक्त ठरतो. सैंधव किंवा पिंक सॉल्टमध्ये आयोडिन पुरेशा प्रमाणात असेलच असे नाही. त्यामुळे उत्पादनावरील माहिती तपासणे आवश्यक आहे.
सैंधव आणि पिंक सॉल्टमध्ये काही खनिजे अल्प प्रमाणात असू शकतात. मात्र, त्यामुळे रक्तदाब किवा हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे ठोस पुरावे नाहीत. या मिठांमध्येही सोडियम असते. त्यामुळे पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव वापरल्याने मिठाच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम टळतात, असे मानणे चुकीचे आहे. असेही तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांमधून समोर आले आहे
दिवसाला किती मीठ खावे?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, प्रौढांनी दिवसाला पाच ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावे. यात स्वयंपाकातील मिठासह लोणचे, पापड, चिप्स, नमकीन, सॉस आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधील मिठाचाही समावेश होतो. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढू शकते
मिठाच्या अतिसेवनामुळं उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढवू शकते. त्यामुळे कोणतेही मीठ वापरताना त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे आयोडिनयुक्त मीठ निवडणे आणि फास्टफूड, पॅकेज्ड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे हा आरोग्याच्या दृष्टीने योग्य पर्याय ठरतो.