राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यासह चार आमदारांना उडवून देण्याचा कट रचला होता अशी भीती दाखवून व्यापाऱ्याला एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपी हा मराठी दिग्दर्शक असल्याचे समोर येतेय.
प्राथमिक माहितीनुसार, व्यापाराकडून खंडणी मागणारा आरोपी हा मराठी दिग्दर्शक असून त्याला मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातून अटक करण्यात आली आहे. मुळचा बीड जिल्ह्यातील रहिवाशी असलेला रवी रोकडे काही वर्षांपासून नांदेडमध्ये राहतो. नांदेडमधील व्यपारी महेश तुतारे आणि आरोपीची ओळख होती. रवी रोकडे तुतारे यांना एक लाख रुपये मागत होता, असं समोर आलं आहे,
14 सप्टेंबर रोजी आरोपी रोकडे याने तुतारे यांना फोन करून पुन्हा एका लाखाची खंडणी मागितली. मी तीन वर्षांपूर्वी कारेगाव येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि नांदेडच्या चार आमदारांना उडवण्याचा प्लॅन केला होता, माझ्या पाठीशी मोठ्या लोकांचे हात आहेत, अशी भीती आरोपीने व्यापाऱ्याला दाखवली होती. त्यावरुन खंडणी मागितली होती.
तुतारे यांनी अशोक चव्हाण आणि आमदारांची नावंही घेतल्याने रोकडे यांनी प्रकरणात काहीतरी काळंबेरं दिसतंय हे पाहून थेट पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत रोकडे याला मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातून अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची पोलीसांनी प्रसिद्धी पत्रक काढून दिली आहे.
आरोपीने नेमक्या कोणत्या हेतूने हा कट रचला, यामागे त्याचे इतर साथीदार आहेत का? याचा सखोल तपास करण्यासाठी त्याला नांदेड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. व्ही. बोयणे करीत आहेत. दरम्यान, आरोपीने नेमके कोणत्या हेतूने हा बनाव रचला, यामागे इतर कोणी साथीदार आहेत का? किंवा अन्य कोणत्याही नेत्याबाबत घातपाताचा कट होता का? या सर्व बाजूंचा सखोल तपास पोलीस करत आहेत.