पाणीसंकट गहिरे, आजोबा-नातवांच्या डोळ्यातील अश्रू पाहून अलका कुबल भावूक
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री अलका कुबल यांनी झी 24 तासच्या उत्सव बांधिलकीदरम्यान दुष्काळग्रस्तांसोबत दिवाळी साजरी केली.
दुष्काळ, पाणीटंचाई आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात यंदा दिवाळीचा आनंद काहीसा हरवला होता. अशाच शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण फुलवण्यासाठी झी २४ तासने यंदाची दिवाळी थेट बळीराजाच्या दारी जाऊन साजरी केली. शृंगारवाडीत झी २४ तासच्या उत्सव बांधिलकीदरम्यान अभिनेत्री अलका कुबल यांनी शाळकरी मुलांसोबत आकाशकंदील तयार केले.
दुष्काळामुळे ज्यांच्या आयुष्यात अंधार दाटला. त्यांच्या घरी प्रत्यक्ष दिवाळी साजरा करण्यासाठी झी 24 तासनं उत्सव बांधिलकीचा हा उपक्रम सुरु केलाय. हा उपक्रम आज बीडच्या शिरुरकासार तालुक्यातील श्रृंगारवाडीत पार पडला. शेतक-यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या चेह-यावर हसू फुलवण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल सहभागी झाल्या होत्या.
अलका कबुल यांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मुलांसोबत घरी आकाश कंदील करायला शिकवला. इतकंच नव्हे तर त्यांच्यासोबत रांगोळ्या काढून दिवाळीसण साजरा केला. संकटातील कुटुंबांना सणाच्या काळात आपुलकीचा आधार देणे, हा या मोहिमेमागचा हेतू. कारण दिवाळीचा खरा अर्थ केवळ आपल्या घरात दिवे लावण्यात नाही, तर दुसऱ्याच्या आयुष्यातही आनंदाचा एक दिवा पेटवण्यात आहे.
झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी गावातील एका शेतकऱ्यांशी संवाद साधत त्याच्या अडचणी जाणून घेतल्या. तेव्हा आजोबांच्या अश्रूंचा बांध फुटला. दुष्काळामुळे पाणीसंकट गहिरं बनलं नसून यामुळे नातीही दुरावली आहेत. गावात काम नसल्यानं अनेक जण बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांची जबाबदारी वृद्ध आजी आजोबांवर आली आहे. हेच सांगताना श्रुंगारवाडीतील आजोबांना अश्रू अनावर झाले. आजोबांच्या व त्यांच्या नातवांच्या डोळ्यातील अश्रू पाहून अलका कुबल यांनाही गहिवरुन आले.
'सगळ्यात आधी मी झी 24 तासच्या उपक्रमाचं खूप खूप अभिनंदन करते. सामाजिक बांधिलकी प्रत्येक नागरिकांमध्ये असणे गरजेचे आहे. पण नागरिक म्हणून हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. की आपल्या महिन्याच्या पगारातील 10 टक्के इन्कम तरी या फंडला दिलं तर गावोगावच्या समस्या मिटू शकतात,' असं अलका कुबल यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना म्हटलं आहे.
'मी ग्रामीण भागातील लोकांना जोडत गेले आयुष्यभर. दुखः असतात प्रत्येकाच्या आयुष्यात पण त्याला ओलांडून आपल्याला पुढे जायचंय. आत्महत्या हा मार्ग नाही. आपला लढा हा आपल्यालाच द्यायचाय. तुमची पुढची पिढी चांगली शिकतेय. त्यामुळं तुमचा पाठिंबा असणे खूप गरजेचा आहे. कारण त्यांनाही माहितीये आपल्या आई-वडिलांचे कष्ट. पुढच्या वर्षी खूप पाऊस पडू देत, उत्तम पिक येऊदेत,' असंही अलका कुबल यांनी म्हटलं आहे.
इतकंच नव्हे तर, अलका कुबल यांनी श्रृंगारवाडीतील लहान लेकरांना आकाश कंदील बनवायलाही शिकवले आहेत. तर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांच्या परिस्थितीचीही पाहणी केली.