'मराठी माणसाचा द्वेष थांबवा....' नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूड दिग्गजांच्या अनुपस्थिती, माजी आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केली खंत
Amol Mitkari On Nana Patekar Funeral : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील डोणजे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडच्या दिग्गजांची अनुपस्थिती होती, ज्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी खंत व्यक्त केली.
Amol Mitkari On Nana Patekar Funeral : मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरुवार 8 ऑक्टोबर रोजी गोव्यात निधन झालं. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांना गुरुवारी पहाटे हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दुर्दैवाने घरी एकटेच असल्याने त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. नाना पाटेकर यांनी 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. चित्रपटसृष्टीला देखील नाना पाटेकरांच्या निधनाने धक्का बसला होता. गुरुवारी रात्री उशिरा पुण्यातील डोणजे येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नानांवर प्रेम करणारे अनेक लोकांसह राज्याचे दोन उपमुख्यमंत्री, राजकीय नेते, मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार हे नानांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.
नानांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडच्या दिग्गजांची अनुपस्थिती :
गुरुवारी सकाळी 5:30 च्या सुमारास नाना पाटेकर यांचं दुःखद निधन झालं. त्यानंतर बराचकाळ काही कायदेशीर आणि वैद्यकीय प्रक्रिया सुरु होती. दुपारी 4 वाजता त्यांच्या पुण्यातील डोणजे या गावी नानांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती मिळाली. मात्र अनेक कारणांमुळे नानांचा मृतदेह डोणजे येथे आणण्यास उशीर झाला. नानांचा मुलगा मल्हार याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. नानांच्या निधनावर देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज तसेच बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला. अनेकजणांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्या तर काहीजणांना सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. नाना पाटेकर हे जवळपास 48 वर्ष सिनेसृष्टीत सक्रिय होते तर त्यांनी जवळपास १०० हून अधिक चित्रपटात कामं केली. पुण्यातील अंत्यविधीला अनेक मराठी तसेच बॉलिवूडच्या दिग्गजांची अनुपस्थिती होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी खंत व्यक्त केली आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटमधील कलाकारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नानांच्या अंत्यसंस्काराला मोजकेच बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित राहिले, तर अनेक बड्या कलाकारांनी केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिल्याची खंत मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. नाना पाटेकर यांचा साधेपणा, शेती-मातीशी असलेली नाळ आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं कार्य यांचा उल्लेख करत, त्यांच्या या जीवनप्रवासाची चार भिंतींच्या आत राहून जीवन जगणाऱ्या कलाकारांना अडचण होती का, असा सवाल अमोल मिटकरींनी उपस्थित केला. बॉलिवूडमधील काही लोकांमध्ये असंवेदनशीलतेचा कळस दिसून आला असून, मराठी माणसाबद्दलचा तिरस्कार काही कलाकारांनी थांबवावा, असंही मिटकरी म्हणाले. मुंबई पुण्यातील कलाकार केवळ सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत असतील, तर त्यांनीही या भूमिकेचा विचार करावा, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.