विदर्भाकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पूर्व विदर्भातील दळणवळणाला नवी दिशा देण्यासाठी तब्बल 42 हजार कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. आता नागपूरला आणखी चार मोठ्या वेगवान हायवेने जोडण्यात येणार आहे. हे महामार्ग आहेत, नागपूर - गोंदिया, नागपूर - चंद्रपूर, भंडारा - गडचिरोली आणि नवेगाव मोरे-सूरजागड. या चार महामार्गामुळे शहरांच्या विकासासोबत दळणवळणाला नवी दिशा मिळणार आहे. या चारही प्रकल्पासाठी राज्य सरकारने 42 हजार कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. या महामार्गाचा सर्वाधिक फायदा कृषी, खनिज आणि औद्योगिक वाहतुकीला मिळणार अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
या चारही महामार्गाबद्दल सांगायचं झालं तर सर्वात आधी या महामार्गाची लांबी जाणून घेऊयात
नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्ग - 162.577 किलोमीटर
नागपूर-चंद्रपूर महामार्ग - 204.799 किलोमीटर
भंडारा-गडचिरोली महामार्ग - 94.241 किमी
या सर्व महामार्गाची एकूण लांबी ही 460 किलोमीटरहून अधिक लांबी असणार आहे.
या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्चही सांगण्यात आला आहे. नागपूर-गोंदिया प्रकल्पासाठी प्रत्यक्ष बांधकाम खर्च 8,033.37 कोटी अपेक्षित आहे. तर जीएसटीसह प्रकल्प खर्च 12,878.24 कोटींपर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे. या मार्गासाठी 20 वर्षांच्या मुदतीचे 10,140 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यासोबतच भागभांडवलाच्या स्वरूपात 4,552.01 कोटींसाठीही मान्यता मिळाली आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव-कोनसरी-मूलचेरा-हेदरी ते सूरजागड या मार्गासाठी 3,954.99 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे.
आता नागपूर - चंद्रपूर महामार्गाचा प्रत्यक्ष बांधकाम खर्च 8,223.59 कोटी अपेक्षित आहे असं प्रकल्पाच्या करारात नमूद करण्यात आलंय. शिवाय जर विविध अनुषंगिक खर्च आणि जीएसटी धरून या प्रकल्पाचा खर्च 16,354.55 कोटींचा घरात अपेक्षित आहे, ज्याला शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी 20 वर्षांच्या मुदतीचे 12,880 कोटी रुपयांचे कर्जासोबत 4.725.26 कोटींच्या भागभांडवलास शासनाने मंजुरी दिली आहे. तसंच भंडारा-गडचिरोली महामार्गाचा प्रत्यक्ष बांधकामासाठी 5,995 कोटींचा खर्च करारात मांडण्यात आला आहे. तर राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी 9,610.63 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता प्रकल्पांचा कामांना वेग मिळणार असून भविष्यात या महामार्गांमुळे नागपूरला एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. शिवाय नागपूरच्या विकासात मोठा हातभार लागणार आहे.