महायुतीतील मित्रपक्षांच्या नाराजीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपसह महायुतीतील घटक पक्षांवर उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. काँग्रेससोबत असताना रिपब्लिकन पक्षाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व मिळत होते; मात्र आता भाजपसोबत आल्यानंतर पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या सत्तेत पक्षाला योग्य वाटा मिळावा आणि विधान परिषदेच्या जागा देण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. रामदास आठवलेंसह इतर नेत्यांच्या नाराजीचा आगामी काळात महायुतीवर काही परिणाम होणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. नेमकं काय म्हणाले आठवले? त्याचे कसे पडसाद उमटू शकतात? सविस्तर जाणून घेऊया.
पालघर येथे पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी महायुतीतील रिपब्लिकन पक्षाच्या स्थानाबाबत नाराजी व्यक्त केली. भाजपसोबत युती असूनही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सत्तेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नसल्याचे ते म्हणाले. केंद्रात आपल्याला मंत्रिपद मिळाले असले, तरी महाराष्ट्रातील पक्ष संघटनेला सत्तेत योग्य वाटा मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. केवळ पक्षाच्या प्रमुखाला महत्त्व देऊन चालणार नाही, तर कार्यकर्त्यांचाही विचार झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेससोबत असताना रिपब्लिकन पक्षाला निवडणुकीत योग्य जागा मिळत होत्या, अशी आठवण आठवले यांनी करून दिली. भाजपसोबत 2014 पासून युतीत असूनही पक्षाला विधान परिषदेची एकही जागा मिळालेली नाही, अशी त्यांची तक्रार आहे. याउलट शरद पवार यांच्यासोबत असताना रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेच्या सात जागा मिळाल्या होत्या, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे सध्याच्या महायुतीने पक्षाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेच्या काही जागा देण्यात याव्यात, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. यापूर्वीही त्यांनी किमान एक जागा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आगामी काळात विधान परिषदेतील प्रतिनिधित्वाबरोबरच विविध सरकारी महामंडळांवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी, अशीही त्यांची मागणी आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
आठवले यांनी केवळ भाजपकडेच नव्हे, तर महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडेही रिपब्लिकन पक्षाला योग्य वाटा देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सत्तेतील पदे आणि महामंडळांवरील नियुक्त्यांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटप आणि सत्तावाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचाही पर्याय खुला असल्याचे आठवले यांनी पालघरमधील पत्रकार परिषदेत सूचित केले.आता भाजप आणि महायुतीतील इतर घटक पक्ष आठवलेंच्या नाराजीची दखल घेऊन काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.